अभिनेत्री नेहा शर्मा वडिलांसाठी मैदानात, म्हणाली "यावेळी इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होणारच..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 18:05 IST2025-11-11T18:04:21+5:302025-11-11T18:05:10+5:30
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री नेहा शर्मा हिचे वडील अजित शर्मा काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

अभिनेत्री नेहा शर्मा वडिलांसाठी मैदानात, म्हणाली "यावेळी इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होणारच..."
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आज ११ नोव्हेंबर रोजी मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला असून भागलपूरम मतदारसंघात मतदान झालं. या मतदारसंघातून लोकप्रिय अभिनेत्री नेहा शर्मा हिचे वडिल अजित शर्मा रिंगणात आहेत. अजित शर्मा हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी अनेकदा निवडणूक जिंकत यश मिळवलं आहे. यंदा त्यांच्या प्रचारासाठी अभिनेत्रीनं जोर लावल्याचं पाहायला मिळालं. नेहा शर्मा भागलपूरमध्ये तिच्या वडिलांसाठी प्रचार करताना दिसली होती. आज नेहाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावेळी काँग्रेसचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
नेहा शर्माने आज (मंगळवारी) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने लोकांना 'हुशारीने' मतदान करण्याचे आवाहन केले. नेहा शर्माने लिहिले, "भागलपूरमधील प्रत्येकाला माझे हृदय कुठे आहे हे माहित आहे. माझे वडील नेहमीच काँग्रेससोबत राहिले आहेत. यावेळी, देवाच्या कृपेने, भारत आघाडी सरकार स्थापन होईल. मतदान करा. हुशारीने, तुमच्या देशासाठी. प्रत्येक मत महत्त्वाचे आहे".

याआधी नेहाने आपल्या वडील अजित शर्मा यांच्या समर्थनार्थ जबरदस्त रोड शो केला, ज्यामध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. रस्त्यावरून जाताना ती लोकांना हात जोडून अभिवादन करताना आणि मतांसाठी आवाहन करताना दिसली.
भागलपूर मतदारसंघात तिरंगी लढत
यावेळी भागलपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अजित शर्मा भाजपच्या रोहित पांडे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. भाजपने एनडीए आघाडीकडून आपला उमेदवार उभा केला आहे. त्यांच्याशिवाय प्रशांत किशोर यांच्या जनसुरज पक्षाचे अभय कांत झा हे देखील निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातून एकूण १२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मात्र, मुख्य लढत काँग्रेसचे अजित शर्मा आणि भाजपचे रोहित पांडे यांच्यात होत आहे. नेहा शर्माच्या प्रचाराचा मतदारांवर किती परिणाम होतो, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.