आर्यन खानसाठी रूमर्ड गर्लफ्रेंडची पोस्ट, शाहरुखच्या लेकाचा फोटो शेअर करत म्हणाली "यू आर द बेस्ट"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:44 IST2025-11-13T12:43:01+5:302025-11-13T12:44:31+5:30
लारिसाने आर्यनसाठी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर खास पोस्ट शेअर केली.

आर्यन खानसाठी रूमर्ड गर्लफ्रेंडची पोस्ट, शाहरुखच्या लेकाचा फोटो शेअर करत म्हणाली "यू आर द बेस्ट"
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान काल १२ नोव्हेंबर रोजी २८ वर्षांचा झाला. सोशल मीडियावर त्याचे चाहते आणि अनेक सेलिब्रिटींनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती एका खास पोस्टची. जी त्याची रुमर्ड गर्लफ्रेंड लारिसा बोनेसी हिने शेअर केली होती. लारिसाच्या या प्रेमळ पोस्टने पुन्हा एकदा दोघांच्या डेटिंगच्या अफवांना हवा दिली आहे.
लारिसाने आर्यनच्या वाढदिवसानिमित्त तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर खास पोस्ट शेअर केली. आर्यनचा फोटो शेअर करत लारिसाने लिहिलं, "एकमेव आणि अद्वितीय अशा व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! तू संपूर्ण विश्व +1 मिळवण्यासाठी पात्र आहेस. तुझे सर्व स्वप्नं पूर्ण होवोत, अशी इच्छा! मला तुझा खूप अभिमान आहे, आणि तुझ्या यश-आनंदासाठी मी नेहमी शुभेच्छा देत राहीन! तू सर्वात उत्तम आहेस, तूच नंबर १ आहेस". या पोस्टमधून तिचं आर्यनवर असलेलं प्रेम दिसून आलं. विशेष म्हणजे, आर्यन खाननेही ही पोस्ट त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली.
लारिसा बोनेसी आर्यन खानला नेहमीच पाठिंबा देताना दिसली आहे. आर्यनची पहिली दिग्दर्शित सीरिज 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'चे पोस्टर रिलीज झाल्यावर, लारिसाने ते लगेचच शेअर केले होते. तसेच, सीरिजच्या घोषणेनंतर तिने सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला होता. तसेच 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' स्क्रीनिंगलाही ती हजर होती आणि तिचे फोटोही व्हायरल झाले होते. आर्यन आणि लारिसा दोघेही त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगून आहेत.
आर्यनपेक्षा वयानं मोठी आहे लारिसा
लारिसा बोनेसी ही एक ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे. IMDb वर दिलेल्या माहितीनुसार लारिसा बोनेसीचा जन्म २८ मार्च १९९४ रोजी झाला असून ती आर्यन खानपेक्षा वयाने मोठी आहे. आर्यन खानचा जन्म १३ नोव्हेंबर १९९७ रोजी झाला, तर लारिसाचा जन्म २८ मार्च १९९४ रोजी झाला. याचा अर्थ दोघांमध्ये ३ वर्षे ७ महिने १५ दिवसांचं अतंर आहे.