लॉकडाऊनमुळे सात महिन्यांच्या बाळासह कर्जतमध्ये अडकला आहे हा अभिनेता, झाली आहे अशी अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 13:12 IST2020-03-28T13:10:19+5:302020-03-28T13:12:10+5:30
या अभिनेत्यानेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना याविषयी माहिती दिली आहे.

लॉकडाऊनमुळे सात महिन्यांच्या बाळासह कर्जतमध्ये अडकला आहे हा अभिनेता, झाली आहे अशी अवस्था
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे सामान्य लोकच नव्हे तर अनेक सेलिब्रेटी देखील आपल्या घरातून बाहेर पडत नाहीयेत. काहीजण त्यांच्या कामानिमित्त शहराच्या बाहेर गेले असल्याने त्यांना आता घरी देखील परतता येत नाहीये.
सध्या सगळेच सेलिब्रेटी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असून आपल्या फॅन्सना सोशल मीडियाद्वारे आपण कुठे आहोत, काय करत आहोत याविषयी माहिती देत आहेत. अर्जुन रामपाल सध्या त्याच्या संपूर्ण कुटुंबियासह कर्जतमध्ये अडकलेला आहे. त्यानेच ही माहिती सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना दिली आहे. अर्जुनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आाहे. त्याने या व्हिडिओद्वारे सांगितले आहे की, लॉकडाऊन घोषित व्हायच्याआधी मी एका चित्रपटाचे चित्रीकरण कर्जतमध्ये करत होतो. त्यामुळे आता मी चित्रीकरणाच्या ठिकाणीच अडकलो आहे.
अर्जुनची दाढी वाढलेली असल्याचे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यावर अर्जुनने सांगितले आहे की, माझी ही अवस्था पाहून मी साधू बनलो आहे का असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल... पण आता कोरोना व्हायरसमुळे सगळ्यांवरच एखाद्या साधुसारखे जीवन जगण्याची वेळ आली आहे. देशात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर कुठेही न जाता एकाच ठिकाणी थांबावे असा निर्णय मी घेतला आणि गेल्या काही दिवसांपासून मी इथेच राहात आहे. येथील वातावरण खूपच चांगले असून मी माझ्या कुटुंबियांसोबत येथे राहात आहे. तुम्ही देखील तुमच्या कुटुंबियांसोबत खूप चांगला वेळ घालवत असाल अशीच मी आशा करेन...
अर्जुन सध्या त्याची प्रेयसी गैब्रिएला आणि सात महिन्यांच्या मुलासोबत कर्जतमध्ये खूप चांगला वेळ घालवत आहे.