‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ पुस्तकाच्या मुखपृष्ठावर अनुपम खेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 20:00 IST2018-09-29T13:45:44+5:302018-09-29T20:00:00+5:30
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे पूर्व मीडिया सल्लागार संजय बारू यांच्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ पुस्तकाच्या कव्हरवर अभिनेते अनुपम खेर यांचा ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ सिनेमातील लूक वापरण्यात आला आहे.

‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ पुस्तकाच्या मुखपृष्ठावर अनुपम खेर
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मनमोहन सिंग यांचे पूर्व मीडिया सल्लागार संजय बारू यांच्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ पुस्तकावर आधारीत आहे. हे पुस्तक मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीवर आधारीत आहे. ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटात अभिनेते अनुपम खेर मनमोहन सिंग यांची भूमिका साकारत आहेत. त्यांचा लूक हुबेहुब मनमोहनसिंग यांच्यासारखा आहे. त्यामुळे संजय बारब यांच्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’च्या कव्हरवर अभिनेते अनुपम खेर यांचा सिनेमातील लूक वापरण्यात आला आहे. नवीन कव्हर असलेले पुस्तक १९ ऑक्टोबरला बाजारात उपलब्ध होणार आहे.
याबाबत या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय गुट्टे म्हणाले की, आम्हाला माहित आहे की या सिनेमाचा फर्स्ट लूक लोकांना खूप आवडला आणि प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबाबत उत्सुकता आहे. मात्र आता सिनेमातील लूक पुस्तकाच्या कव्हरवर झळकणार आहे, ही आमच्यासाठी खूप मोठी बाब आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली आहे. तर विजय रत्नाकर गुट्टे हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्ना हाही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. संजय बारूचे पात्र तो रंगवणार आहे. आहना कुमरा ही अभिनेत्री प्रियांका गांधीच्या तर अर्जुन माथुर राहुल गांधी यांच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.