बिग बींचा नातू अगस्त्य नंदाचं 'इक्कीस' सिनेमातून रुपेरी पदार्पण, फर्स्ट लूक आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 13:36 IST2025-10-15T13:35:46+5:302025-10-15T13:36:26+5:30
Amitabh Bachchan's grandson Agastya Nanda : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा 'इक्कीस' सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

बिग बींचा नातू अगस्त्य नंदाचं 'इक्कीस' सिनेमातून रुपेरी पदार्पण, फर्स्ट लूक आला समोर
बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा 'इक्कीस' सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अभिनेत्याचा दमदार लूक पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अगस्त्य शहीद लेफ्टनंटच्या भूमिकेत दिसणार आहे.
अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाने 'द आर्चीज' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली असली तरी, तो आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. त्याच्या पहिल्या चित्रपट 'इक्कीस'चे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये अगस्त्य नंदा जवानांच्या गणवेशात आणि हातात बंदूक घेऊन दिसत आहे. मॅडॉक फिल्म्सने 'इक्कीस'चे दोन नवीन पोस्टर शेअर केले आहेत. हे पोस्टर पाहून हा चित्रपट युद्ध, शौर्य आणि बलिदानावर आधारित असेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. पोस्टरच्या बॅकग्राउंडमध्ये युद्धाचे वातावरण दिसत आहे.
सर्वात विशेष बाब म्हणजे, १४ ऑक्टोबर रोजी शहीद अरुण खेत्रपाल यांच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी अगस्त्यचा हा फर्स्ट लूक शेअर केला आहे. एका पोस्टरमध्ये अगस्त्य युद्धासाठी तयार दिसत आहे. या चित्रपटात अगस्त्य शहीद लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
कोण होते अरुण खेत्रपाल?
अरुण खेत्रपाल यांना १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान वीरगती प्राप्त झाली होती. त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र या सर्वोच्च लष्करी सन्मानाने गौरवण्यात आले होते. ते एक टँक कमांडर होते आणि त्यांच्या शौर्यासाठी ते ओळखले जातात, कारण युद्धादरम्यान त्यांनी एकट्याने शत्रूचे १० टँक उद्ध्वस्त केले होते. अरुण खेत्रपाल यांना देशाचे सर्वात तरुण वीर म्हणून ओळखले जाते. अवघ्या २१ वर्षांच्या तरुण वयात ते शहीद झाले.
'इक्कीस' चित्रपट
'इक्कीस' या चित्रपटातून परमवीर चक्र विजेते सर्वात तरुण अधिकारी अरुण खेत्रपाल यांची सत्यकथा पडद्यावर येणार आहे. मॅडॉक फिल्म्स आणि दिनेश विजान प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले आहे. अगस्त्य नंदा शहीद अरुण खेत्रपाल यांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर चित्रपटात जयदीप अहलावत यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका असेल. हा चित्रपट डिसेंबर २०२५ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर शेअर करत लिहिले की, "इक्कीस' नावाची एक अशी कथा जी नेहमीच आपल्या हृदयात राहील."