'रेहमान डकैत'च्या लूकसाठी अक्षय खन्नाने बदललं रूप! केलं हेअर ट्रान्सप्लांट? जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 13:34 IST2025-12-29T13:33:27+5:302025-12-29T13:34:22+5:30
अक्षय खन्नाने 'धुरंधर'मधील भूमिकेसाठी हेअर ट्रान्सप्लांट केले? जाणून घ्या...

'रेहमान डकैत'च्या लूकसाठी अक्षय खन्नाने बदललं रूप! केलं हेअर ट्रान्सप्लांट? जाणून घ्या सत्य
सध्या अक्षय खन्ना त्याच्या 'धुरंधर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने 'रेहमान डकैत' ही भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. 'धुरंधर'मधील त्याचा डान्स असो वा त्याची स्टाईल, अक्षय खन्ना त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. चित्रपटातील त्याचा डॅशिंग लूक आणि डोक्यावरील दाट केस पाहून चाहत्यांना एकच प्रश्न पडला आहे की, अक्षय खन्नाने खरंच हेअर ट्रान्सप्लांट केलं आहे का? विशेष म्हणजे या प्रश्नासोबतच आता एक नवा वादही समोर आला आहे.
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचे लांब आणि दाट केस दिसत आहेत, जे त्याच्या खऱ्या आयुष्यातील लूकपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. मात्र, ताज्या रिपोर्ट्सनुसार, अक्षयने या भूमिकेसाठी हेअर ट्रान्सप्लांट केलेले नाही. रेहमान डकैतची भूमिकेसाठी त्याने एका उच्च दर्जाच्या 'हेअर पॅच' किंवा 'विग'चा वापर केला आहे. प्रोस्थेटिक आर्टिस्ट प्रीतिशील सिंग यांनी या लूकवर काम केलं. हे इतके नैसर्गिक वाटले की कॅमेऱ्यातही किंवा मोठ्या पडद्यावर त्याचे केस खरे नसल्याचा लवलेशही जाणवला नाही. त्याच्या या लूकची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.

'विग'मुळे 'दृश्यम ३' मधून हकालपट्टी?
दरम्यान, अशी चर्चा रंगली आहे की अक्षय खन्नाचा हा 'विग' लूक केवळ 'धुरंधर'पुरता मर्यादित राहिला नाही, तर तो एका वादाचे कारण ठरला. 'दृश्यम ३' या चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी अक्षयवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, अक्षयने 'दृश्यम ३' मध्येही विग वापरण्याचा हट्ट धरला होता. मात्र, 'दृश्यम २' मध्ये तो विनाकेसांचा होता आणि तिसरा भाग तिथूनच सुरू होत असल्याने दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी ही मागणी फेटाळली. या वादातून अक्षयने चित्रपट सोडला असून निर्मात्यांनी त्याला कायदेशीर नोटीस बजावली आहे.