मिस वर्ल्डच्या नादात ऐश्वर्याने नाकारलेला ९०च्या दशकातला ब्लॉकबस्टर सिनेमा, लागली या अभिनेत्रीची वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 12:37 IST2025-10-17T12:36:48+5:302025-10-17T12:37:34+5:30
Aishwarya Rai Bachchan : मिस वर्ल्ड बनत असताना ऐश्वर्या राय बच्चनला नव्वदच्या दशकातील एका ब्लॉकबस्टर चित्रपटाची ऑफर मिळाली होती. पण आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेला गांभीर्याने घेणाऱ्या ऐश्वर्याने त्या चित्रपटाची ऑफर नाकारली होती.

मिस वर्ल्डच्या नादात ऐश्वर्याने नाकारलेला ९०च्या दशकातला ब्लॉकबस्टर सिनेमा, लागली या अभिनेत्रीची वर्णी
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. अभिनेत्री होण्यापूर्वी ती एक प्रोफेशनल मॉडेल होती, ज्या अंतर्गत तिने १९९४ साली मिस वर्ल्डचा किताब जिंकून देशाचे नाव उज्वल केले. मिस वर्ल्ड बनत असताना ऐश्वर्याला नव्वदच्या दशकातील एका ब्लॉकबस्टर चित्रपटाची ऑफर मिळाली होती. पण आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेला गांभीर्याने घेणाऱ्या ऐश्वर्याने त्या चित्रपटाची ऑफर नाकारली. त्यानंतर तो चित्रपट दुसऱ्या अभिनेत्रीला मिळाला आणि असे झाले की, त्या अभिनेत्रीचे नशीब चमकले. ती ऐश्वर्यापेक्षा मोठी सुपरस्टार बनली.
मॉडेल म्हणून ऐश्वर्या रायची कारकीर्द खूपच गाजली. मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर आणि त्यापूर्वी तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या, पण तिने त्या सर्वांना बाजूला सारून योग्य वेळी अभिनयात पदार्पण केले. ऐश्वर्याने ज्या चित्रपटांना नकार दिला होता, त्यापैकी एक चित्रपट म्हणजे दिग्दर्शक राजीव राय यांचा 'मोहरा'.
आयएमडीबीच्या रिपोर्टनुसार, १९९४ मध्ये आलेल्या अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी अभिनीत या चित्रपटाची ऑफर ऐश्वर्या रायला मिळाली होती. पण मिस वर्ल्ड स्पर्धेमुळे तिने या चित्रपटासाठी नकार दिला आणि त्यानंतर हा चित्रपट रवीना टंडनला मिळाला. रवीनाच्या अभिनय कारकिर्दीत 'मोहरा' हा चित्रपट एक महत्त्वाचा टप्पा ठरला आणि या चित्रपटानंतर ती इंडस्ट्रीत स्टार बनली. 'मोहरा' चित्रपट त्या वर्षातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक होता. सलमान खानच्या 'हम आपके हैं कौन' नंतर, 'अक्की' आणि सुनीलचा 'मोहरा' हा ३१ वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला होता.
'ही' अभिनेत्री होती 'मोहरा'साठी पहिली पसंती
रवीना टंडनने 'मोहरा'मध्ये रोमा सिंगची भूमिका साकारली होती. खरेतर 'मोहरा'मधील रोमाच्या भूमिकेसाठी सुरुवातीला दिव्या भारतीला घेण्यात आले होते. मात्र, तिच्या आकस्मिक निधनामुळे निर्मात्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आणि त्यानंतर त्यांनी ऐश्वर्या रायसह अनेक अभिनेत्रींशी संपर्क साधला होता. पण शेवटी ही भूमिका रवीनाच्या पदरी पडली आणि या भूमिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.