​‘ऐ दिल’,‘रईस’चं नाहीत तर या चित्रपटांनादेखील बसलायंं ‘राज’कारणाचा फटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 13:41 IST2016-12-13T13:27:30+5:302016-12-13T13:41:32+5:30

काल-परवा किंगखान शाहरूख खान ‘कृष्णकुंज’वर गेल्याची बातमी धडकली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. शाहरूखचा ‘रईस’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतो ...

'Ai Dil', 'Rais', if not, these films also hit 'Raj'! | ​‘ऐ दिल’,‘रईस’चं नाहीत तर या चित्रपटांनादेखील बसलायंं ‘राज’कारणाचा फटका!

​‘ऐ दिल’,‘रईस’चं नाहीत तर या चित्रपटांनादेखील बसलायंं ‘राज’कारणाचा फटका!

ल-परवा किंगखान शाहरूख खान ‘कृष्णकुंज’वर गेल्याची बातमी धडकली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. शाहरूखचा ‘रईस’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतो आहे आणि याच निमित्ताने शाहरूख ‘कृष्णकुंज’ गेला. कशासाठी? तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांना भेटण्यासाठी. पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी घालण्याची मागणी राज ठाकरेंनी लावून धरली आहे. ‘रईस’मध्ये  पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यानिमित्ताने शाहरूख राज ठाकरे यांना भेटला आणि त्यांच्या अटी मान्य करून परतला. यापूर्वी करण जोहरही  राज ठाकरे यांच्या अटी मान्य करून असाच ‘कृष्णकुंज’वरूनपरतला होता. केवळ शाहरूख व करण जोहरच नाही तर राज ठाकरे यांनी याआधीही अनेक चित्रपटांच्या निर्मात्यांना धारेवर धरले आहे...अशाच काही चित्रपटांविषयी....'



किंगखान शाहरूख खान याचा ‘रईस’ हा सिनेमा लवकर प्रदर्शित होणार आहे.  मात्र त्यापूर्वीच चित्रपटाच्या प्रदर्शनात कुठलेही विघ्न नकोत, यासाठी शाहरूख कामाला लागल्याचे चित्र आहे. होय, रविवारी शाहरूखने मनसेप्रमुख राज ठाकरे यांची  त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशीही बोलले. भारतातील ‘रईस’च्या प्रमोशनमध्ये माहिरा खानचा कुठलाही सहभाग नसेल, विशेषत: हे सांगण्यासाठी शाहरूख आपल्याला भेटायला आला होता, असे राज यांनी सांगितले.

दी लास्ट लिअर 



सन २००८ मध्ये मुंबईत मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांवर हल्ला केला. या घटनेनंतर जया बच्चन यांनी ‘कौन है राज ठाकरे?’ असा सवाल केला होता. याच वर्षी अमिताभ बच्चन उत्तर प्रदेशचे ब्रँड अ‍ॅम्बिसीडर बनले. नेमक्या याच कारणाने मनसेने अमिताभ यांना लक्ष्य केले होते. यावरही जया बच्चन यांनी राज ठाकरे यांच्यावर जाहिर टीका केली होती. या टीकेनंतर मनसेने अमिताभ यांच्या ‘दी लास्ट लिअर’ या चित्रपटाला जोरदार विरोध केला होता.  अभिषेक बच्चन याच्या ‘द्रोण’या सिनेमाचे प्रदर्शन हाणून पाडण्याची धमकीही मनसेने दिली होती. अखेर या वादात जया बच्चन यांना झुकते घेत, माफी मागावी लागली होती.

वेक अप सिड



सन २००९ मध्ये ‘वेक अप सिड’ या अयान मुखर्जी दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित सिनेमाला मनसेच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. रणबीर कपूर याची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात मुंबईचा उल्लेख ‘बॉम्बे’ असा करण्यात आला होता. या कारणावरून मनसे कार्यकर्त्यांनी या चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडले होते.  

माय नेम इज खान



सन २०१० मध्ये पुन्हा एकदा करण जोहरच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाला मनसेने लक्ष्य केले होते. यात शाहरूख खान मुख्य भूमिकेत होता. आयपीएलमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंना खेळवू नये, अशी भूमिका त्यावेळी मनसेने घेतली होती आणि आयपीएल टीमचा मालक या नात्याने शाहरूखने मनसेच्या या भूमिकेला विरोध केला होता. याचा फटका शाहरूखच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाला बसला होता. ‘माय नेम इज खान’विरूद्ध मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली होती.

मर्डर2



सन २०११ मध्ये ‘कुर्बान’ या सिनेमात करिना कपूरने टॉपलेस सीन दिला होता. मनसेने याला तीव्र विरोध नोंदवत करिना कपूरला साडी पाठवली होती. यानंतर मनसेने  महेश भट्ट यांच्या ‘मर्डर2’ या चित्रपटाचे चित्रीकरण बंद पाडले होते. ‘मर्डर2’च्या क्रू मेंबर्सकडे आवश्यक परवाना नसल्याचा मुद्दा समोर करत मनसेने या चित्रपटाला लक्ष्य केले होते.

खिलाडी ७८६



‘खिलाडी ७८६’ या अक्षय कुमारच्या चित्रपटालाही मनसेच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. परिक्षा सुरु असताना कॉलेज कॅम्पसमध्ये या चित्रपटाचे शूटींग होणार नाही,अशी भूमिका मनसेने घेतली होती. या चित्रपटाच्या शूटींगसाठी मेकर्सने कॉलेज प्रशासनाची परवानगी घेतली होती.याऊपरही मनसेने ‘खिलाडी ७८६’चे शूटींग हाणून पाडले होते.

चेन्नई एक्सप्रेस



‘चेन्नई एक्सप्रेस’ हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका मनसेने घेतली होती. ‘चेन्नई एक्सप्रेस’च्या मेकर्सने सिंगल स्क्रीन असलेल्या सर्व चित्रपटगृहांतील प्राईम स्लॉटची मागणी केल्याने या ठिकाणचे मराठी सिनेमे काढून टाकण्यात आले, असा दावा मनसेने केला होता. शिवाय या प्रकरणावरून ‘चेन्नई एक्सप्रेस’चे प्रदर्शन हाणून पाडण्याचा इशारा दिला होता.

ऐ दिल है मुश्किल



पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी असावी, अशी मागणी करत मनसेने ‘ऐ दिल है मुश्किल’ला विरोध केला होता. या चित्रपटात पाकी अभिनेता फवाद खान याची भूमिका असल्याने मनसेने या चित्रपटाला विरोध केला होता. अखेर करण जोहरला राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्या अटी मान्य कराव्या लागल्या होत्या.

Web Title: 'Ai Dil', 'Rais', if not, these films also hit 'Raj'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.