'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 13:26 IST2025-09-29T13:26:01+5:302025-09-29T13:26:46+5:30
Ahaan Pandey : अहानच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षक खूप प्रभावित झाले आहेत आणि त्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या सिनेमानंतर त्याला मोठा जॅकपॉट लागला आहे. आता त्याने दोन दिग्गज दिग्दर्शकासोबत हातमिळवणी केली आहे.

'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
बॉलिवूडचा नवोदित अभिनेता अहान पांडे (Ahaan Pandey) याने याच वर्षी रिलीज झालेल्या 'सैयारा' (Saiyaara Movie) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अहानच्या या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ छप्परफाड कमाईच केली नाही, तर लाखो-करोडो लोकांची मनेही जिंकली. मोहित सूरी दिग्दर्शित 'सैयारा' या चित्रपटाने जगभरात ५६४.८४ कोटी रुपयांचे जबरदस्त कलेक्शन केले आहे. अहानच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षक खूप प्रभावित झाले आहेत आणि त्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या सिनेमानंतर त्याला मोठा जॅकपॉट लागला. आता त्याने दोन दिग्गज दिग्दर्शकासोबत हातमिळवणी केली आहे.
अभिनेता अहान पांडे दिग्दर्शक अली अब्बास जफरसोबत काम करणार आहे. पिंकविलाच्या माहितीनुसार, अहानने त्याच्या आगामी चित्रपटासाठी अली अब्बास जफरसोबत हातमिळवणी केली आहे. अली अब्बास यांनी यापूर्वी 'सुलतान' आणि 'टायगर जिंदा है' यांसारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. हा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट देखील यश राज फिल्म्स (YRF) च्या बॅनरखाली बनवला जात आहे. यशराज फिल्म्ससोबत अहान पांडेचा हा दुसरा चित्रपट असेल. हा चित्रपट ॲक्शन रोमान्स प्रकारातील असेल असे म्हटले जात आहे. अली अब्बास जफर पुन्हा एकदा 'सुलतान' आणि 'टायगर जिंदा है' सारख्या ॲक्शनमध्ये परत येत आहेत आणि यावेळेस त्यांनी त्यांच्या चित्रपटासाठी 'सैयारा'मधील अभिनयाने प्रभावित झालेल्या अहानची निवड केली आहे.
आदित्य चोप्राने सुचवले अहानचे नाव
या चित्रपटासाठी आदित्य चोप्रा यांनी अली अब्बास जफर यांना अहान पांडेचे नाव सुचवले होते, कारण अहानला अजून फार मोठे एक्स्पोजर मिळालेले नाही. त्यामुळे 'सैयारा' नंतर तो आणखी काय करू शकतो हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट निश्चित झाली आहे आणि सध्या संगीतवर काम सुरू आहे. दिग्दर्शक आणि निर्माते २०२६ च्या पहिल्या तिमाहीत चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्याची योजना आखत आहेत. मात्र, अहान किंवा चित्रपट निर्मात्यांकडून अद्याप याची पुष्टी करण्यात आलेली नाही.
भन्साळींसोबतही काम करण्याची शक्यता?
केवळ अली अब्बास जफरच नाही, तर अहान पांडे संजय लीला भन्साळी यांच्यासोबतही चित्रपट करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. नुकताच अहान भन्साळी यांच्या कार्यालयातून बाहेर पडताना दिसला. त्यामुळे, अहान हा संजय लीला भन्साळी यांच्या पुढील चित्रपटाचा हिरो असू शकतो, असा अंदाज लावला जात आहे. मात्र या संदर्भात भन्साळी किंवा अहान या दोघांकडूनही कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.