'वीराना'मध्ये भूताची भूमिका साकारणारी अभिनेत्री जॅस्मिनचा ३७ वर्षांनंतर बदलला लूक, एअरपोर्टवर झाली स्पॉट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 14:23 IST2025-11-18T14:22:39+5:302025-11-18T14:23:45+5:30
Actress Jasmine : १९८८ साली आलेल्या 'वीराना' चित्रपटातील जॅस्मिन आठवतेय? भूताची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे बॉलिवूडवर राज्य करत होती, पण अचानक चित्रपटांतून गायब झाली. आता ३७ वर्षांनंतर तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'वीराना'मध्ये भूताची भूमिका साकारणारी अभिनेत्री जॅस्मिनचा ३७ वर्षांनंतर बदलला लूक, एअरपोर्टवर झाली स्पॉट?
बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्री हवेच्या झुळूकसारख्या आल्या आणि मग सिनेमातून कायमस्वरूपी गायब झाल्या. 'वीराना' चित्रपटातील जॅस्मिन त्यापैकीच एक आहे. भूताचे पात्र साकारणारी जॅस्मिन 'वीराना' चित्रपटामुळे रातोरात स्टार बनली होती. 'वीराना'मध्ये केवळ तिच्या अभिनयानेच नव्हे, तर जॅस्मिनने तिच्या सौंदर्याने लोकांना वेड लावले होते. 'वीराना' यशस्वी झाला आणि जॅस्मिनलाही स्टारडम मिळाले, पण ती अचानक चित्रपटांतून गायब झाली.
विनोद खन्ना यांच्यासोबत 'सरकारी मेहमान' चित्रपटातून तिने वयाच्या केवळ १३ व्या वर्षी पदार्पण केले होते. त्यानंतर ती 'डाइवोर्स' चित्रपटातही दिसली. या चित्रपटांपेक्षा तिला खरी ओळख रामसे ब्रदर्सच्या 'वीराना' चित्रपटातून मिळाली, ज्यात तिने पुरुषांना मोहित करून त्यांची हत्या करणाऱ्या भूताची भूमिका केली होती. या चित्रपटानंतर जॅस्मिनची सगळीकडे चर्चा होऊ लागली होती. पण यापूर्वी तिला कोणताही मोठा चित्रपट मिळण्याआधीच तिने गुपचूप इंडस्ट्रीला रामराम ठोकला. अभिनेत्री कुठे गेली, काय करत आहे, याबद्दल कोणालाच माहिती नव्हते. मात्र, आता ३७ वर्षांनंतर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
जॅस्मिनचा व्हिडीओ झाला व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ब्लू जीन्स आणि शर्ट परिधान केलेल्या महिलेला जॅस्मिन असल्याचे सांगितले जात आहे. 'बॉलिवूड टेस्ट' नावाच्या इन्स्टाग्राम पेजने हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "वीरानाची व्हायरल जॅस्मिन एअरपोर्टवर दिसली." पण तुम्हाला सांगायचे की, हा जॅस्मिनचा व्हिडिओ AI वापरून बनवला गेला आहे. जॅस्मिनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच लोक तिची तुलना सनी लिओनीशी करू लागले. एका युजरने म्हटले, "जर ती खरच असेल तर ती आजही खूप सुंदर आहे." एकाने कमेंट केली, "म्हातारपणी सनी लिओनी देखील अशीच दिसेल. आजही सुंदर आहे." एका चाहत्याने "किती सुंदर आहे" असे लिहिले.
आता कुठे आहे 'वीराना'ची जॅस्मिन?
२०१७ मध्ये रामसे ब्रदर्सनी खुलासा केला होता की आईच्या निधनानंतर जॅस्मिनने इंडस्ट्री सोडली होती. ती मुंबईतच राहते. मात्र, ती काय करते, याबद्दल कोणालाच माहिती नाही.