कॅन्सरशी झुंज संपली...! अभिनेत्याने अमेरिकेत घेतला अंतिम श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 01:01 PM2020-05-10T13:01:17+5:302020-05-10T13:01:26+5:30

अमेरिकेतील लॉस एंजिल्समधील रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

actor sai gundewar dies with brain cancer-ram | कॅन्सरशी झुंज संपली...! अभिनेत्याने अमेरिकेत घेतला अंतिम श्वास

कॅन्सरशी झुंज संपली...! अभिनेत्याने अमेरिकेत घेतला अंतिम श्वास

googlenewsNext
ठळक मुद्देअलीकडे बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान यानचे कॅन्सरने निधन झाले. यानंतर ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचीही कॅन्सरशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली होती.  

हरहुन्नरी अष्टपैलू युवा अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे आज सकाळी निधन झाले. साईप्रसाद हा हा गेली दोन वर्ष  ग्लायोब्लास्टोमाने (ब्रेन कॅन्सरने) त्रस्त होता. अमेरिकेतील लॉस एंजिल्समधील रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सकाळी साडे सातच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
22 फेब्रुवारी 2019 रोजी त्याच्या अमेरिकेत शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून तो हॉस्पिटलमध्येच उपचार घेत होता.  

साईने एम टीव्हीच्या Splitsvilla, Season 4, स्टार प्लसवरील Survivor तसेच अमेरिकेतील लोकप्रिय S.W.A.T.,  Cagney and Lacey, The Orville, The Mars Conspiracies,The Card मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये त्याने 'रॉक ऑन', 'पप्पू कान्ट डान्स साला', 'लव्ह ब्रेकअप जिंदगी', 'डेव्हिड', 'आय मी और मैं', 'पीके', 'बाजार' इत्यादी हिंदी चित्रपटांसोबतच काही हॉलिवूडच्या चित्रपट व लघुपटांमध्ये त्याने विविध भूमिका केल्या आहेत. तसेच डॉ. मीना नेरुरकर यांच्या 'ए डॉट कॉम मॉम' या एकमेव मराठी चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका केली आहे. 'ए डॉट कॉम मॉम' या मराठी चित्रपटात त्याने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तसेच अनेक जाहिरातींमध्ये देखील तो झळकला होता. तो एक अभिनेता असण्यासोबतच एक प्रसिद्ध व्यवसायिक देखील होता. फूडिझम या जेवण पोहचवण्याचे काम करणाऱ्या कंपनीचा तो को-फाऊंडर होता.

2015 साली फॅशन डिझायनर सपना अमीनसोबत साई लग्नबेडीत अडकला होता.  त्याच्या पश्चात पत्नी सपना, आई शुभांगी, राजश्री, वडील राजीव असा परिवार आहे. अतिशय तरुण वयात त्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.

अलीकडे बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान यानचे कॅन्सरने निधन झाले. यानंतर ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचीही कॅन्सरशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली होती.
   

Web Title: actor sai gundewar dies with brain cancer-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.