क्या बात! मराठी अभिनेत्याची हिंदी सिनेमात वर्णी, मनोज वाजपेयीसोबत करणार स्क्रीन शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 13:35 IST2025-08-12T13:34:48+5:302025-08-12T13:35:20+5:30
नेटफ्लिक्सवर ‘इन्स्पेक्टर झेंडे’ प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमात मनोज वाजपेयीसोबत भाऊ कदमही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. भाऊ कदमसोबतच आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची ‘इन्स्पेक्टर झेंडे’मध्ये वर्णी लागली आहे.

क्या बात! मराठी अभिनेत्याची हिंदी सिनेमात वर्णी, मनोज वाजपेयीसोबत करणार स्क्रीन शेअर
मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत असलेल्या ‘इन्स्पेक्टर झेंडे’ या सिनेमाची सध्या चर्चा आहे. मराठमोळे पोलीस अधिकारी मधुकर झेंडे यांच्या कामगिरीवर आधारित या सिनेमाची कथा असणार आहे. नेटफ्लिक्सवर ‘इन्स्पेक्टर झेंडे’ प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमात मनोज वाजपेयीसोबत भाऊ कदमही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. भाऊ कदमसोबतच आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची ‘इन्स्पेक्टर झेंडे’मध्ये वर्णी लागली आहे.
मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकलेला आणि ऐतिहासिक सिनेमांत बहिर्जी नाईकांची भूमिका हुबेहुब वठवणारा अभिनेता हरिष दुधाडे ‘इन्स्पेक्टर झेंडे’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तो महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. हरिष दुधाडेने त्याच्या सोशल मीडियावरुन ‘इन्स्पेक्टर झेंडे’ सिनेमातील एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो मनोज वाजपेयीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे.
‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा भारतीय पोलिसांच्या कामगिरीला सलाम करणारा एक सिनेमा आहे. याची निर्मिती ओम राऊतने केली आहे. तर लेखन, दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरचं आहे. अधिकारी मधुकर झेंडेंनी चार्ल्स शोभराजला दोनवेळा पकडलं होतं. त्यांच्याच धाडसी कामगिरीवर आधारीत हा सिनेमा आहे. या सिनेमात लोकप्रिय अभिनेता मनोज बाजपेयी ‘इन्स्पेक्टर मधुकर झेंडे’ यांची भूमिका साकारत असून, जिम सरभ ‘स्विमसूट किलर’ कार्ल भोजराज या हुशार चोराची भूमिका निभावत आहे. ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर ५ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.