रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 13:01 IST2025-08-09T13:00:32+5:302025-08-09T13:01:28+5:30
Ramayan Movie : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या आगामी 'रामायण' चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. आता या चित्रपटात एका प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री झाली आहे.

रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor)च्या आगामी 'रामायण' (Ramayan Movie) चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. यामध्ये तो भगवान श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. दाक्षिणात्य स्टार यश या चित्रपटात रावणाची भूमिका साकारत आहे. दरम्यान, अभिनेता चेतन हंसराजची या चित्रपटात एन्ट्री झाली आहे. नुकतेच त्याने चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेचा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, तो 'रामायण' मध्ये रावणाच्या आजोबा सुमालीची भूमिका साकारत आहे. चेतन हंसराजने असेही सांगितले की, चित्रपटाची कथा त्याच्या व्यक्तिरेखेपासून सुरू होते.
मिनिट्स ऑफ मसालाशी बोलताना चेतन हंसराज म्हणाला, ''मी नुकतेच रणबीर आणि यश अभिनीत 'रामायण'चे शूटिंग पूर्ण केले आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम प्रोजेक्टपैकी एक आहे. त्याची पातळी, शूटिंगचा अनुभव, हॉलिवूडची टीम, सगळंच सर्वोत्तम होते. हा अनुभव अविश्वसनीय होता.' ' चेतनने सुमालीची त्याची भूमिका चित्रपटासाठी खूप महत्त्वाची असल्याचे वर्णन केले.
चेतन हंसराजने सांगितले की, ''सेटवर उपस्थित असलेले अनुभवी हॉलिवूड तंत्रज्ञही चित्रपटाचा आकार पाहून चकित झाले. मी चित्रपटात रावणच्या आजोबाची भूमिका केली आहे. ही खूप महत्त्वाची भूमिका आहे, कथा त्याच्यापासून सुरू होते. मी जास्त काही सांगू शकत नाही, पण हे आतापर्यंतचे सर्वात नेत्रदीपक शूटिंग आहे. मी यापूर्वी कधीही असे काही पाहिले नव्हते. हॉलिवूडहून आलेले लोकही म्हणू लागले की बॉस, हे काहीतरी वेगळेच आहे.''
पहिला भाग या दिवाळीला होणार प्रदर्शित
‘रामायण’चं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं आहे. साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत, लारा दत्ता कैकेयीच्या भूमिकेत, शीबा चड्ढा मंथराच्या भूमिकेत, रवी दुबे लक्ष्मणच्या भूमिकेत आणि अरुण गोविल दशरथाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग ‘१’ २०२६ च्या दिवाळीत प्रदर्शित होण्याची योजना आहे. दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीत दाखल होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या भागाचे चित्रीकरण या वर्षी ऑक्टोबरपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे.