आरोपी सुकेश चंद्रशेखरनं जॅकलिनला भेट दिला होता 52 लाखांचा घोडा अन् 9 लाखांचं मांजर...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 13:17 IST2021-12-05T13:15:05+5:302021-12-05T13:17:53+5:30
Money Laundering Case : तब्बल 200 कोटी रूपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चांगलीच अडचणीत येण्याची चिन्हं आहेत.

आरोपी सुकेश चंद्रशेखरनं जॅकलिनला भेट दिला होता 52 लाखांचा घोडा अन् 9 लाखांचं मांजर...!!
तब्बल 200 कोटी रूपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील (Money Laundering Case) आरोपी सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) याच्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) चांगलीच अडचणीत येण्याची चिन्हं आहेत. होय, सुकेशचं चुंबन घेतानाचा जॅकलिनचा एक सेल्फी समोर आल्यानं खळबळ माजली होती. त्यावेळी जॅकलिन सुकेशला डेट करत असल्याचं म्हटलं जातंय. आता काय तर सुकेशनं जॅकलिनवर लाखो रूपयांची उधळपट्टी केल्याचं समोर आलं आहे. होय, सुकेशने जॅकलिनला खूश करण्यासाठी तिला कोट्यवधी रूपयांच्या भेटवस्तू दिल्या होत्या.
प्राप्त माहितीनुसार, सुकेश हा जॅकलिनला चेन्नईमध्ये चार वेळा भेटला होता. या भेटींसाठी त्याने प्रायव्हेट जेटचीही व्यवस्था केली होती. आता याच सुकेशने जॅकलिनला भेट म्हणून 52 लाखांचा घोडा आणि 9 लाख रुपयांचं पर्शियन मांजर भेट दिल्याचं समोर आलं आहे. याचबरोबर त्याने अनेकदा जॅकलिनला महागडे दागिने भेट दिल्याचंही कळतंय.
सुकेश याच्याविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केलं असून, त्यात ही माहिती उघड झाली आहे. या आरोपपत्रात जॅकलिनसोबत अभिनेत्री नोरा फतेही हिचंही नाव आहे. सुकेशने म्हणे नोराला खूप महागडी कार भेट म्हणून दिली होती. या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने यापूर्वीच दोन्ही अभिनेत्रींची चौकशी केली आहे.
जॅकलिन गेल्या 20 आॅक्टोबरला या प्रकरणी ईडीसमोर हजर झाली होती. ईडीच्या पथकाकडून तिची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात सुकेश चंद्रशेखर मुख्य आरोपी आहे. कर चुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यातंर्गत जॅकलिनचा जबाब त्यावेळी नोंदवण्यात आला होता. जॅकलिनचे आर्थिक व्यवहार आणि सुकेश चंद्रशेखरसोबत तिची ओळख यामुळे ती ईडीच्या रडारवर आहे. सुकेश चंद्रशेखरचा जॅकलिनचा काही आर्थिक व्यवहार झाला होता का? या दिशेनं ईडी तपास करत आहे.