"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:59 IST2025-12-29T16:59:06+5:302025-12-29T16:59:48+5:30
Imran Khan : इमरान खानने एका मुलाखतीत आपल्या करिअरमधील चढ-उतार आणि झगमगाटापासून दूर असलेल्या आयुष्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे.

"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
अभिनेता इमरान खानने २००८ मध्ये जिनिलिया डिसुझासोबत 'जाने तू... या जाने ना' या पहिल्या चित्रपटातून रातोरात लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर त्याच्या चित्रपटांनी सरासरी कामगिरी केली, पण त्याचे करिअर फार काळ टिकू शकले नाही. सध्या तो अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. दरम्यान, इमरान खानने एका मुलाखतीत आपल्या करिअरमधील चढ-उतार आणि झगमगाटापासून दूर असलेल्या आयुष्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे.
समदिशच्या 'अनफिल्टर्ड विथ समदिश' या पॉडकास्टमध्ये बोलताना अभिनेत्याने सांगितले की, पहिल्या चित्रपटाच्या यशामुळे त्याला बॉलिवूडच्या रायझिंग स्टार्सच्या यादीत स्थान मिळाले, पण हे स्टारडम लगेच मागे पडले आणि कामही कमी झाले. पहिल्या हिटनंतर आपले मानधन वाढले होती हे इमरानने मान्य केले, मात्र कुटुंबाच्या नावामुळे आपल्याला सहज यश मिळाले, या दाव्यातील सत्यता त्याने फेटाळून लावली.
''आमिर अंकलचा पैसा माझा नाही''
'नेपोकीड' या टॅगला थेट उत्तर देताना तो म्हणाला की, आमिर खानचा भाचा असल्याने फिल्म इंडस्ट्रीत यशाची खात्री मिळते, असा लोकांचा समज असतो. त्याने स्पष्ट केले की, त्याच्या आयुष्यातील वास्तव लोकांच्या कल्पनेपेक्षा खूप वेगळे आहे. कुटुंब तुम्हाला संधी, स्टारडम किंवा पैशाची गॅरंटी देऊ शकत नाही. इमरान पुढे म्हणाला, "माझे अंकल आमिर खान एक फिल्म स्टार आहेत. ते माझ्या आईचे चुलत भाऊ आहेत... तो पैसा माझा नाही, तो मला मिळणार नाही".
इंडस्ट्रीतील मानधनातील तफावतीवर उपस्थित केला सवाल
इमरान खानने फिल्म इंडस्ट्रीत असलेल्या मानधनातील तफावतीवर प्रश्न उपस्थित केले. त्याने रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांसारख्या मोठ्या कलाकारांच्या भरमसाठ मानधनाचा उल्लेख केला, तर दुसरीकडे अनेक कलाकार योग्य पगारासाठी संघर्ष करत असल्याचे सांगितले.
काम न मिळाल्याने आर्थिक स्थितीवर झाला परिणाम
दशकाहून अधिक काळ चित्रपटांपासून दूर असलेल्या या अभिनेत्याने प्रसिद्धीझोतातून बाहेर पडल्यानंतर आलेल्या आर्थिक परिस्थितीवरही भाष्य केले. गेल्या दहा वर्षांत त्याच्या आयुष्यात अनेक मोठे बदल झाले, ज्यात पत्नी अवंतिका मलिकसोबत झालेला घटस्फोट समाविष्ट आहे. या काळात काम न मिळाल्यामुळे आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम झाल्याचे इमरानने सांगितले. मात्र, विचारपूर्वक केलेल्या नियोजनामुळे त्याला आर्थिकदृष्ट्या स्थिर राहण्यास मदत झाली. आयुष्यातील प्रत्येक निर्णय केवळ नफा-तोट्याच्या हिशोबावर घेऊ नये; काही निर्णय स्वतःच्या शांततेसाठी आणि आनंदासाठीही घ्यावे लागतात, असेही त्याने नमूद केले.