राणी मुखर्जीनं राष्ट्रीय पुरस्कार खास व्यक्तीला समर्पित केला, भावुक होत म्हणाली "हा सन्मान मी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 12:50 IST2025-09-24T12:48:56+5:302025-09-24T12:50:01+5:30
राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर राणी मुखर्जीने आपले मनोगत व्यक्त केलं.

राणी मुखर्जीनं राष्ट्रीय पुरस्कार खास व्यक्तीला समर्पित केला, भावुक होत म्हणाली "हा सन्मान मी..."
71st National Film Awards Rani Mukerji: भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय पुरस्काराचा वितरण समारंभ काल दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पाडला. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राणी मुखर्जीला प्रदान करण्यात आला. अभिनेत्रीला 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. राणी मुखर्जीला आपल्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर राणीने आपले मनोगत व्यक्त केलं.
राणी मुखर्जीनं पहिला राष्ट्रीय पुरस्कार वडिलांना अर्पण केला. राणीने सांगितले की, हा सन्मान तिच्यासाठी खूप मोठा आहे आणि ती हा पुरस्कार तिच्या स्वर्गीय वडिलांना समर्पित करते. राणी म्हणाली, "मी खरोखरच भारावून गेले आहे. हा सन्मान माझ्यासाठी खूप मोठा आहे आणि मी तो माझ्या स्वर्गीय वडिलांना अर्पण करते. त्यांनी नेहमीच अशा क्षणाचे स्वप्न पाहिले होते. आज त्यांची खूप आठवण येते. मला माहित आहे की त्यांचे आशीर्वाद आणि माझ्या आईची प्रेरणा व ताकदच मला 'मिसेस चॅटर्जी'ची भुमिका करताना साथ देत होती".
यासोबतच राणीने तिच्या चाहत्यांचेही आभार मानले. ती म्हणाली, "माझ्या अद्भुत चाहत्यांनो, सुख-दुःखात माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. तुमचं न थांबणारं प्रेम आणि साथ हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे. मला माहित आहे की हा पुरस्कार तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला आनंद झालेला पाहून माझ्या मनालाही अपार आनंद मिळतोय".
राणीने चित्रपटाची दिग्दर्शिका असीमा छिब्बर, निर्माते निखिल अडवाणी, मोनिषा अडवाणी आणि मधु भोजवानी, तसेच संपूर्ण टीमचे आभार मानले. राणी म्हणाली, कोविडच्या कठीण काळात टीमने केलेल्या मेहनतीमुळेच हा चित्रपट शक्य झाला. हा सन्मान जगातील सर्व मातांना अर्पण करते. "मिसेज चटर्जी व्हर्सेस नॉर्वे ही कथा मला मनापासून भिडली, कारण ती एका आईच्या न थांबणाऱ्या लढ्याची कहाणी आहे. आई म्हणून हा रोल माझ्यासाठी खूप वैयक्तिक होता", असे ती म्हणाली. याशिवाय तिने राष्ट्रीय पुरस्काराच्या ज्युरीचेही आभार मानले. "ही फिल्म आणि हा क्षण माझ्या हृदयात कायम खास राहील", असं राणीनं म्हटलं.