"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 20:44 IST2025-08-05T20:43:12+5:302025-08-05T20:44:39+5:30
६० आणि ६१ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार मिळाल्यावर अनुपम खेर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर नामांकित राज कपूर कपूर, व्ही शांताराम, जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान केले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. यावेळी अभिनेता अनुपम खेर यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अनुपम खेर गेली अनेक वर्ष हिंदी, साउथ सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. इतकंच नव्हे हॉलिवूडमध्येही अनुपम खेर यांनी काम केलंय. आज ६० आणि ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनुपम खेर यांना स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, उद्योगमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते हा खास पुरस्कार देण्यात आला.
यावेळी जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यानंतर अनुपम खेर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात. अभिनेते म्हणाले, "मी ३ जून १९८१ साली मुंबईत आलो. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा मी गोल्ड मेडलिस्ट होतो. मी ज्या नोकरीच्या शोधात आलो होतो तिथे नोकरी नव्हतीच. मला धोका मिळाला. त्यावेळी चाळीच्या एका छोट्या रुममध्ये राहत होतो. मला त्या चाळीचा पत्ताही माहित नव्हता. त्यावेळी टॅलेंटपेक्षा हेअरस्टाईलला महत्व असायचं."
"त्यावेळी मला माझा पत्ता कळाला की, अनुपम खेर, खेरवाडी, खेरनगर, बांद्रा इस्ट, असा माझा पत्ता होता. ४० वर्ष लगेच सरकली. माझं या शहराप्रती प्रेम, सन्मान माझं तसंच आहे. मुंबई शहर खूप मोठ्या मनाचं आहे. इथे जो कोणी येतो त्याला एक संधी जरुर मिळते. आज मी ७० वर्षांचा आहे पण मी इतका म्हातारा दिसत नाही. मी माझ्या आयुष्याच्या प्रवासात अजून मध्यंतरापर्यंतही नाही पोहोचलो. यानंतर ३० वर्षांनीही मी असाच चालत राहीन."