12th Fail फेम विक्रांत मेसीने दाखवली बाळाची झलक, नावंही ठेवलंय खूपच खास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 09:40 IST2024-02-24T09:39:56+5:302024-02-24T09:40:11+5:30
विक्रांत आणि शीतलला ७ फेब्रुवारीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. आता बाळाच्या जन्मानंतर विक्रांतने पहिल्यांदाच त्याची झलक दाखवली आहे.

12th Fail फेम विक्रांत मेसीने दाखवली बाळाची झलक, नावंही ठेवलंय खूपच खास
बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेसी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. '12th Fail' सिनेमामुळे विक्रांत प्रसिद्धीझोतात आला आहे. या सिनेमातील त्याने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. काही दिवसांपूर्वीच विक्रांतच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं. विक्रांतची पत्नी शीतल ठाकूर हिने गोंडस बाळाला जन्म दिला. बाबा झाल्यानंतर विक्रांतचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आता बाळाच्या जन्मानंतर विक्रांतने पहिल्यांदाच त्याची झलक दाखवली आहे.
विक्रांत आणि शीतलला ७ फेब्रुवारीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विक्रांतने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. त्यानंतर आता विक्रांतने बाळाचा फोटो शेअर केला आहे. विक्रांतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पत्नी शीतलबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने बाळाची झलकही दाखवली आहे. याबरोबरच बाळाचं नावंही त्याने पोस्टमधून सांगितलं आहे. विक्रांत आणि शीतलने त्यांच्या लाडक्या लेकाचं नाव वरदान असं ठेवलं आहे. "आशीर्वादापेक्षा कमी नाही...म्हणून आम्ही त्याचं नाव वरदान ठेवलं आहे," असं कॅप्शन विक्रांतने या फोटोला दिलं आहे.
विक्रांत मेसीने २०२२ मध्ये शीतल ठाकूरशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांना नव्या पाहुण्याची चाहुल लागली. आईबाबा झाल्याने विक्रांत आणि शीतल आनंदी आहेत. विक्रांतने अनेक मालिका, सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. त्याची 'ब्रोकन बट ब्युटिफूल' ही सीरिजही प्रचंड गाजली होती.