अभिनयासाठी घरदार सोडलं, जमीनही विकली; आता कुठे गायब झालाय 'बाहुबली'चा कटप्पा?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 09:44 AM2023-10-04T09:44:15+5:302023-10-04T09:45:06+5:30
Sathyaraj: सत्यराज यांनी २०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे.
एस.एस. राजामौली यांचा सुपरहिट ठरलेला सिनेमा म्हणजे बाहुबली. उत्तम कथानक, भव्यदिव्य सेट आणि कलाकारांचा अभिनय यामुळे या सिनेमाचे दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले. यात खासकरुन बाहुबली आणि कटप्पा या दोन पात्रांची आणि त्यांच्या संवादांची खूप चर्चा रंगली. या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता सत्यराज यांनी कटप्पा ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे ते साऊथसह बॉलिवूडमध्येही लोकप्रिय झाले. परंतु, यश आणि प्रसिद्धी मिळवणाऱ्या सत्यराज यांचा हा प्रवास सोपा नव्हता. कलाविश्वात येण्यापूर्वी त्यांनी बराच मोठा स्ट्रगल केला आहे.
सत्यराज यांचं खरं नाव रंगाराज सुबय्या असं असून त्यांनी २०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आजवरच्या कारकिर्दीत त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या. परंतु, बाहुबलीच्या कटप्पाने त्यांना वेगळी ओळख निर्माण करुन दिली. विशेष म्हणजे कलाविश्वात येण्यासाठी त्यांनी त्यांचं घरदार सोडलं. इतकंच नाही तर आईच्या विरोधातही ते गेले.
आईचा विरोध पत्करुन केलं इंडस्ट्रीत पदार्पण
सत्यराज यांना लहानपणापासून इंडस्ट्रीत काम करायचं होतं. अभिनेता होणं हे त्यांचं स्वप्न होतं. मात्र, त्यांच्या या स्वप्नाला आईचा विरोध होता. त्यांच्या आईला फिल्म इंडस्ट्री पसंत नव्हती. त्यांचे वडील एक डॉक्टर होते. तर, आई गृहिणी. पण, आपल्या मुलाने या क्षेत्रात जाऊ नये असं त्याच्या आईचं मत होतं. परंतु, आईचा विरोध असतानाही सत्यराज यांनी इंडस्ट्रीमध्ये येण्याचा ध्यास सोडला नाही. त्यांनी कोडंबक्कम या सिनेमातून त्यांच्या करिअरची सुरुवात केली. हा तामिळ सिनेमा १९७६मध्ये प्रदर्शित झाला होता.
घरदार सोडलं, जमीनही विकली.
सत्यराज यांना बॉटनी या विषयात बीएससीचं शिक्षण घेतलं आहे. मात्र, उच्चशिक्षण घेतल्यानंतरही त्यांना नोकरी मिळत नव्हती. परिणामी, हातात काम नसल्यामुळे घरखर्च चालवण्यासाठी त्यांनी त्यांची जमीन विकली. इतकंच नाही तर, त्यांना त्यांचं राहतं घरसुद्धा विकावं लागलं. घर विकल्यानंतर त्यांनी चेन्नई गाठलं. काही वर्ष चेन्नईमध्ये त्यांनी मिमिक्री केली. त्यानंतर त्यांना १९७८ मध्ये कमल हासन यांचा एनाक्कुल ओरुवन हा सिनेमा मिळाला.
दरम्यान, एनाक्कुल ओरुवन या सिनेमानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. साऊथसह बॉलिवूडमध्येही त्यांनी काम केलं. शाहरुख खानच्या चेन्नई एक्स्प्रेस या सिनेमात ते झळकले होते. अलिकडेच त्यांचा सुपर ह्यूमन वेपन हा सिनेमा रिलीज झाला आहे.