सावळ्या रंगामुळे अनेकांनी उडवली खिल्ली; 'आशिकी गर्ल' अनु अग्रवालने इंडस्ट्रीत केला वर्णभेदाचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 12:57 PM2024-03-14T12:57:49+5:302024-03-14T12:58:57+5:30
Anu aggarwal: 'लोक सुपरमॉडल म्हणून माझी खिल्ली उडवायचे'; असं म्हणत अनुने तिच्या कठीण काळावर भाष्य केलं.
'आशिकी' फेम अभिनेत्री अनु अग्रवाल (anu aggarwal) हिने बॉलिवूडचा ९० चा काळ प्रचंड गाजवला. बोल्डनेस आणि बेधडक भूमिका साकारुन तिने लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्रथम स्थान मिळवलं होतं. परंतु, लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या या अभिनेत्रीला इंडस्ट्रीत बराच स्ट्रगल करावा लागला. तिला वर्णभेदाचा सामना करावा लागला.
अलिकडेच अनु अग्रवालने 'दैनिक भास्कर'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने इंडस्ट्रीमध्ये लोकांनी तिला सावळ्या रंगावरुन कसे टोमणे मारले, कसा कमीपणा दाखवला या सगळ्यावर भाष्य केलं. इतकंच नाही तर त्यांना मुंबईतही अनेकांनी राहत्या घरातून बेदखल केलं. त्यामुळे त्यांनी ६ महिन्यात १० वेळा घर बदललं.
"मी पॅरिसमध्ये रहात होते पण कामानिमित्त मुंबईत आले. त्यावेळी महेश भट्ट यांच्यासोबत माझी पहिली भेट झाली. या भेटीत, मी तुझ्यासाठी एक स्क्रिप्ट लिहिली आहे, असं ते म्हणाले. मात्र, मला फिल्म इंडस्ट्रीत करिअर करायचं नव्हतं. पण, ही भूमिका माझ्याशिवाय अन्य कोणीही करु शकणार नाही असं त्यांनी मला सांगितलं. त्यामुळे मी या सिनेमासाठी तयार झाले. पण, हा सिनेमा इतका सुपरहिट होईल असा विचारही मी केला नव्हता. मला कधीच स्टार किंवा सुपरस्टार व्हायचं नव्हतं. मात्र, या सिनेमानंतर माझा सिनेमातील रस वाढू लागला", असं अनु म्हणाली.
पुढे ती म्हणते, "सेटवर अनेक जण माझ्याविषयी वेगवेगळ्या चर्चा करायचे. कोणी माझ्या रंगावरुन बोलायचं, कोणी उंचीवरुन बोलायचं. काही जण तर मुद्दाम सुपरमॉ़डल म्हणून टोमणे मारायचे. मला इंडस्ट्रीतच नाही तर खऱ्या आयुष्यातही अनेकांनी त्रास दिला. मी एका ठिकाणी पीजी म्हणून रहात होते. पण, माझा चेहरा तिला आवडत नव्हता. त्यामुळे तिने मला एका रात्रीत घराबाहेर काढलं. मला सगळीकडेच असा अनुभव आला. मी ६ महिन्यात १० घरं बदलली. मी कायम २ बॅग तयार ठेवायचे. कोणी मला घर सोडायला सांगितलं की मी माझ्या बॅग घेऊन निघायचे."
दरम्यान, मी ज्या ठिकाणी रहायचे तिथे अनेक लोक सिनेमाच्या ऑफर्स घेऊन यायचे. ज्यामुळे घर मालकांना त्रास व्हायचा आणि ते मला घरातून काढून टाकायचे. ठराविक काळानंतर मला काम मिळणं बंद झालं होतं. त्यावेळी मला डंब गर्ल, बोल्ड किंवा फक्त डान्ससाठीच सिनेमात विचारणा करण्यात यायची. मात्र, मी या सिनेमांसाठी नकार द्यायचे, असं म्हणत अनु अग्रवालने तिच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.