काजोलच्या 'माँ' सिनेमासाठी अजय देवगणकडून भन्नाट ऑफर, २ तिकिटांवर १ तिकिट फ्री, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:30 IST2025-06-26T17:29:31+5:302025-06-26T17:30:25+5:30
'माँ' चित्रपट पाहण्यासाठी Buy 2 Get 1 फ्री ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरचा वापर कसा कराल, जाणून घ्या

काजोलच्या 'माँ' सिनेमासाठी अजय देवगणकडून भन्नाट ऑफर, २ तिकिटांवर १ तिकिट फ्री, जाणून घ्या
बॉलिवूड अभिनेत्री काजोल लवकरच तिचा आगामी चित्रपट ‘माँ’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट २७ जून २०२५ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काजोलचा पती आणि अभिनेता अजय देवगणने प्रेक्षकांसाठी एक खास ऑफर जाहीर केली आहे. त्यामुळे ‘माँ’ चित्रपटाला नक्कीच फायदा होईल. अजय देवगणने सांगितलेली ऑफर काय आहे, त्याचा वापर कसा करायचा? सविस्तर जाणून घ्या.
‘माँ’ चित्रपटासाठी अजयची खास ऑफर
‘माँ’ चित्रपटाच्या या खास ऑफरनुसार, जर कोणी ‘माँ’ चित्रपटाची दोन तिकीटे खरेदी केली, तर त्याला तिसरं तिकीट मोफत मिळणार आहे. अजय देवगणने सोशल मीडियावर याबाबतची माहिती देताना लिहिलं की, “२ तिकीटं घ्या, १ फ्री मिळवा! आपल्या जवळच्या थिएटरमध्ये ‘माँ’ पहा २७ जूनपासून.” ही ऑफर फक्त उद्या अर्थात शुक्रवारपर्यंतच मर्यादित आहे. अजयने ही ऑफर सांगताच अनेकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच ‘माँ’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर याचा फायदा होईल.
‘माँ’ चित्रपटाविषयी
‘माँ’ हा चित्रपट एका आईच्या संघर्षाची कथा आहे, जिची मुलगी एका विचित्र आणि भयानक घटनेत अडकते. या चित्रपटात काजोल एका शक्तिशाली आईच्या भूमिकेत दिसणार असून, तिला आपल्या मुलीला वाचवण्यासाठी अंधश्रद्धा आणि अघोरी गोष्टींशी लढताना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. काजोलचा अभिनय, चित्रपटाची पार्श्वभूमी आणि त्यातील रहस्य यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.‘माँ’ हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू आणि बंगाली भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.