अभिनेत्री रंजना यांची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 19:26 IST2022-03-12T19:26:05+5:302022-03-12T19:26:39+5:30
मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

अभिनेत्री रंजना यांची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचं निधन
मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वत्सला देशमुख या मराठी सृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री रंजना यांच्या आई तर ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांच्या बहीण होत्या. लोकप्रिय मराठी चित्रपट पिंजरामध्ये वत्सला देशमुख यांनी काम केले होते. यातील त्यांचे संवाद देखील खूप गाजले होते. याशिवाय बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख अभिनेत्री व सहाय्यक अभिनेत्री म्हणून भूमिका साकारल्या आहेत. तसेच आई, मावशी, काकू, आत्या, आजी अशा विविध भूमिका देखील त्यांनी साकारलेल्या आहेत.
वत्सला देशमुख यांचे वडील श्रीधरपंत देशमुख हे बापुराव पेंढारकर यांच्या ‘ललितकलादर्श’ कंपनीत कार्यरत होते. कंपनीच्या नाटकातून लहान-मोठय़ा भूमिका ते करत असत. नाटक कंपनी फिरती असल्याने आई-वडिलांबरोबर त्यांच्या मुलाचे आणि वत्सला व संध्या या दोन मुलीसोबत ठिकठिकाणी दौरे व्हायचे. तिथूनच दोघी बहिणींना नाटकातून काम करण्याची संधी मिळाली. हिंदी चित्रपट ‘तुफान और दिया’, ‘नवरंग’, ‘ ‘लडकी सह्य़ाद्री की’, ‘हिरा और पथ्थर’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ यात त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या. ‘वारणेचा वाघ’, ‘पिंजरा’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘ज्योतिबाचा नवस’, ‘झुंज’ या मराठी चित्रपटात त्यांनी काम केले.
वत्सला देशमुख यांना तीन अपत्ये होती. त्यांची दोन मुले मोठा मुलगा नरेंद्र वयाच्या पन्नासाव्या वर्षी तर धाकटा मुलगा श्रीकांत यांचे वयाच्या तिसाव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले होते. तर रंजना देशमुख यांचे २००० साली निधन झाले.