शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 09:03 IST2025-07-04T09:02:39+5:302025-07-04T09:03:23+5:30
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीने सोशल मीडियावर पोस्ट करुन इतके दिवस मनात साचलेलं दुःख व्यक्त केलं. ही पोस्ट वाचून अनेकांचे डोळे पाणावले आहेत

शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवालाच्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला. पत्नी शेफालीच्या मृत्यूनंतर ७ दिवसांनी तिचा पती पराग त्यागीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली आहे. जी वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. पराग लिहितो की, "शेफाली माझी परी. काँटा लगा ही तुझी लक्षात राहिलेली ओळख. ही फक्त एका गाण्यापुरती ओळख नव्हती. ती होती एक तेजस्वी ज्वाला, जी सौंदर्याने सजलेली होती, ती होती तीव्र, एकाग्र आणि उद्देशपूर्ण आयुष्य जगणारी स्त्री. तिने स्वतःचं करिअर, मन, शरीर आणि आत्मा, हळुवार पण ठाम इच्छाशक्तीने घडवलं.पण तिच्या पदव्या, यश, किंवा सौंदर्यापलीकडे शेफाली म्हणजे फक्त प्रेम होती, आणि तेही निःस्वार्थ, निर्मळ प्रेम."
"ती होती सगळ्यांची आई... कायम इतरांचा आधी विचार करणारी, तिच्या फक्त उपस्थितीने लोकांना आधार आणि ऊब देणारी. एक दानशूर मुलगी. एक समर्पित, प्रेमळ पत्नी आणि सिंबाची आई. संरक्षण करणारी, मार्गदर्शन करणारी बहीण आणि मावशी. आणि एक अशी मैत्रीण, जी जीव तोडून, प्रेमाने, धैर्याने, आपल्या लोकांसाठी उभी राहायची. आजूबाजूला असलेल्या या गोंधळात, अफवा आणि आवाजांमध्ये हरवून जाणं सोपं आहे. पण शेफालीचं खरं स्मरण तिच्या प्रकाशाप्रमाणे उजळलेल्या स्वभावाचं व्हावं.
जसा तिनं लोकांना अनुभव दिला, जशी आनंदाची ठिणगी तिच्यामुळे निर्माण झाली, जशी अनेकांच्या आयुष्याला तिने अर्थ दिला, त्या गोष्टींची आठवण असावी."
"मी तिच्यासाठी प्रार्थना करतो की, ती जिथे कुठे असेल ती जागा फक्त प्रेमाने भरून राहो. अशा आठवणी की त्यांच्या जखमा हळूहळू भरत आहेत. अशा गोष्टी की ज्या तिच्या आत्म्याला कायम जिवंत ठेवतात. हिच तिची खरी ओळख असू दे, शेफाली ही अशी व्यक्ती होती जी इतकी उजळ होती, की तिला कोणीही, कधीही विसरू शकणार नाही. तुला अनंत काळपर्यंत प्रेम." अशा शब्दात परागने मन मोकळं करुन भावना व्यक्त केल्या आहेत.