अभिनेते ज्युनियर महमूद यांचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 08:13 IST2023-12-08T08:02:22+5:302023-12-08T08:13:40+5:30
Junior Mehmood: कारवां, हाथी मेरे साथी, मेरा नाम जोकर, यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते ज्युनियर महमूद यांचं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते.

अभिनेते ज्युनियर महमूद यांचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
कारवां, हाथी मेरे साथी, मेरा नाम जोकर, यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते ज्युनियर महमूद यांचं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. दीर्घकाळ कर्करोगाशी झुंजत असलेल्या ज्युनियर महमूद यांनी गुरुवारी रात्री राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे.
ज्युनियर महमूद यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांचे जवळचे मित्र सलीम काझी यांनी दुजोरा दिला आहे. ज्युनियर महमूद यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी जॉनी लिव्हर यांनी ज्युनियर महमूद यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समोर आली होती. जॉनी लिव्हर यांच्यानंतर जितेंद्र यांनीही त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती.
ज्युनियर महमूद यांनी ७०-८० च्या दशकामध्या आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. त्यांनी देवानंद, राजेश खन्ना यांच्यापासून ते संजय दत्तपर्यंत अनेक अभिनेत्यांसोबत अभिनय केला होता. ज्युनियर महमूद यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी केवळ हिंदीच नाही तर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ज्युनियर महमदू यांनी अभिनयासोबत दिग्दर्शनामध्येही आपला ठसा उमटवला होता. विनोदी भूमिकांमुळे चित्रपट सृष्टीमध्ये एकेकाळी ज्युनियर महमूद यांचा दबदबा निर्माण झाला होता. तसेच त्यांनी काही टीव्ही मालिकांमधूनही काम केलं होतं.