रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 12:25 IST2025-11-04T12:23:07+5:302025-11-04T12:25:19+5:30
आस्ताद काळेने रोहित आर्याचा व्हिडीओ शेअर करत लिहिले...

रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
काही दिवसांपूर्वी मुंबईला हादरवणारी घटना घडली. ३० ऑक्टोबर रोजी पवईतील आरए स्टुडिओमध्ये रोहित आर्या या व्यक्तीने २० मुलांना ओलीस ठेवले. आपल्याला सरकारशी बोलायचं आहे अशी त्याने मागणी केली होती. तसा व्हिडीओच शेअर केला होता. दरम्यान पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतलं. तर काही वेळाने त्याच्या मृत्यूचीच बातमी आली. पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केल्याचं समजलं. मिनिटा मिनीटाला घडणाऱ्या या घटनेमुळे सगळेच हादरले होते. सुदैवाने सर्व मुलांची सुखरुप सुटका झाली. या घटनेनंतर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. मराठी अभिनेता आस्ताद काळेने पोस्ट शेअर करत आता संशय व्यक्त केला आहे.
आस्ताद काळेने रोहित आर्याचा व्हिडीओ शेअर करत लिहिले, "कोणालाही असं ओलीस धरणं हे चुकीचंच आहे...हा शेवटचा मार्ग "आपलं म्हणणं ऐकलं" जावं म्हणून अवलंबावा लागणं हे दुर्दैवी आहे...आणि पायात/दंडात गोळी घालून त्याला ताब्यात न घेता Vital Organsना निषाणा बनवणं हे संशयास्पद आहे...एवढंच..! बाकी....जय हिंद...जय महाराष्ट्र.....
ता.क:- हे असेच आपले आवाजही बंद करायला येतील....बागुलबुवा खरा ठरेल..."
आस्तादच्या या पोस्टवर अनेकांनी असहमती दर्शवली आहे. 'त्या मुलांमध्ये जर तुझं मूल असतं तरी आज हेच म्हणाला असतास का?' असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. 'त्याने चुकीचा मार्ग अवलंबला होता, पोलिसांनी योग्यच केलं..', 'कदाचित राजकारण्यांनी त्याला फसवलंही असेल, पण कोणाची चुकीची शिक्षा आपण किंवा आपल्या मुलांनी का भोगावी' अशा कमेंट्स आस्तादच्या या पोस्टवर आल्या आहेत.