Satbhai raised Pavsha chicks | सातभाईने केले पावशा पक्ष्याच्या पिल्लाचे पालनपोषण

कोल्हापूरातील चंबुखडी परिसरात सातभाई पक्षी पावशा पक्ष्याच्या पिल्लाला भरवतानाचे छायाचित्र पक्षीप्रेमी संध्या सूर्यवंशी यांनी टिपले आहे.

ठळक मुद्देसातभाईने केले पावशा पक्ष्याच्या पिल्लाचे पालनपोषण घटना कॅमेऱ्यात बंदिस्त

संदीप आडनाईक

कोल्हापूर : कोकीळ कुळातले पक्षी आपलं अंडं दुसऱ्या पक्ष्याच्या घरट्यात टाकून रिकामे होतात, पण त्यांच्या पिल्लांचे पालनपोषण मात्र दुसरेच पक्षी स्वीकारतात. कोल्हापूरातील चंबुखडी परिसरात या निसर्गाच्या चमत्काराचा अनुभव पक्षीप्रेमींना आला आहे.

कोल्हापूरातील चंबुखडी परिसरात पक्षीप्रेमी आणि पक्ष््यांच्या छायाचित्रणाची आवड असणाऱ्या संध्या राहुल सूर्यवंशी यांच्या घराच्या दारात असलेल्या आंब्याच्या झाडावर कोकीळ कुळातील पावशा (हायरोकॉक्सिक्स व्हेरिअस) पक्ष््याने आपलं अंडं या झाडावर असलेल्या सातभाई पक्ष्याच्या घरट्यात ठेवून ती निघून गेली.

पक्षी निरिक्षण आणि छायाचित्रण करताना संध्या यांनी २२ आॅक्टोबर रोजी ही घटना कॅमेऱ्यात बंदिस्त केली. थव्याने एकत्रित वावरणारे सुमारे पाच ते सहा सातभाई पक्षी अंड्यातून बाहेर आलेल्या या पावशा पक्ष्याच्या पिल्लाला भरवत होते. सकाळी आठ वाजल्यापासून काही काही अंतराने हे पक्षी येत होते आणि आपल्या चोचीतून पतंग, कीटक, कीडे, पाखरं असे जे काही मिळेल ते आणून या पिल्याला भरवत होते.

संध्या यांना दुसऱ्या दिवशी मात्र, ते पिल्लं आणि सातभार्इंचा हा थवा दिसला नाही. कदाचीत या पिल्लाला चंबुखडी परिसरात असलेल्या इतर झाडांवर त्यांनी सुरक्षितपणे नेले असावे, असा अंदाज आहे.

ही आहे पावशाची माहिती

पेरते व्हा असा संदेश देणारा पावशा पक्षी आफ्रिकेतून पावसाळ्यात येतात आणि ऋतू संपला की परत जातात. यादरम्यान त्यांची पिल्ले दुसऱ्या पक्ष्याच्या घरट्यात मोठी होतात, आणि परत आपल्या आईकडे आफ्रिकेत परततात. त्यांच्या या वर्तनावर अजून अभ्यास सुरु आहे. या पक्ष्याचा समावेश क्युक्युलिफॉर्मिस गणाच्या क्युक्युलिडी पक्षिकुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव हायरोकॉक्सिक्स व्हेरिअस आहे. तो एकाच जागी राहणारा व निवासी पक्षी आहे.

मार्च-जुलै हा पावशाचा विणीचा हंगाम असतो. कोकिळेप्रमाणे हा पक्षी अंडपरजीवी आहे. पावशाची मादी सातभाई पक्ष्याची नजर चुकवून त्याच्या घरट्यात आपली अंडी घालते. एका घरट्यात ती बहुधा एकच अंडे घालते. आश्रयी सातभाई पक्ष्याच्या निळ्या अंड्यासारखीच पावशाची अंडी असतात. सातभाई पक्षी ती अंडी स्वत:चीच आहेत असे समजून त्यांच्यावर बसून ती उबवितो. त्यातून बाहेर पडणाऱ्या पिलांचेही ते पोषण करतात. पिले मोठी झाली की ती उडून परत आईकडे जातात.

 

Web Title: Satbhai raised Pavsha chicks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.