Love and Politics's unique love story 'Kagar' !! | प्रेम आणि राजकारणाची अनोखी लव्हस्टोरी ‘कागर’!!
प्रेम आणि राजकारणाची अनोखी लव्हस्टोरी ‘कागर’!!

ग्रामीण राजकारण, महिला सबलीकरण, आजच्या समाजकारणाचे वास्तववादी चित्रण करणाऱ्या आणि ‘कागर’ या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि अभिनेता शुभंकर तावडे ही नवी जोडगोळी रसिकांच्या भेटीला आली आहे. परिस्थितीच्या वेगवेगळ्या कसोट्यांवर नात्यांची वीण घट्ट बांधून ठेवतं ते प्रेम आणि नात्यातल्या विश्वासाला वैयक्तिक स्वाथार्साठी उपयोगात आणतं ते राजकारण. एकीकडे हळूवार प्रेम आणि दुसरीकडे राजकारणाचा पट मांडणारा आणि वास्तवाला थेट जाऊन भिडणारा हा ‘कागर’ चित्रपट आजपासून रुपेरी पडद्यावर दाखल झालाय. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद माने दिग्दर्शित ‘कागर’ या चित्रपटाच्या निमित्ताने सीएनएक्सचे वरिष्ठ उपसंपादक अजय परचुरे यांनी त्यांच्याशी साधलेला हा दिलखुलास संवाद.

रिंकू , तब्बल ३ वर्षांनंतर तू ‘कागर’ चित्रपटात काम करतेस. मग, तू ‘कागर’ चीच स्क्रिप्ट का निवडलीस?
- कारण मला पुन्हा पुन्हा एकाच धाटणीच्या भूमिका करायच्या नव्हत्या. मधल्या ३ वर्षांत माझ्याकडे अनेक स्क्रिप्टस आल्या. मात्र, त्या एवढ्या मनाला भिडल्या नाहीत. मकरंद सरांना मी दिल्लीत भेटले तेव्हा त्यांच्यासोबत माझं बोलणं झालं. या चित्रपटात राजकारण, शेतकऱ्यांचे प्रश्न, लव्हस्टोरी, शेती हे सगळं प्रेक्षकांना पडद्यावर बघायला मिळणार आहे. राणीची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक होती. त्यामुळे मला मनापासून हा चित्रपट करावासा वाटला.

शुभंकर, तुला हा चित्रपट कसा मिळाला?
- मी ‘ड्रामा स्कूल आॅफ मुंबई इन्स्टिट्यूट’ मध्ये शिकत होतो. एकांकिका करायचो. तेव्हा मला मकरंद सरांनी नाटकावेळी पाहिले होते. मध्यंतरी मी ‘फ्रेशर्स’ ही मालिका करत होतो. मला त्यांच्याकडून या चित्रपटाची जेव्हा आॅफ र आली तेव्हा मलाही भूमिका आवडली. काहीशी वेगळी वाटली. म्हणून या चित्रपटाची आॅफर स्विकारायचे असे ठरवले.

रिंकू, नागराज मंजुळे हे तुझे गुरु, मार्गदर्शक आहेत. तू त्यांना या चित्रपटाच्या बाबतीत भेटलीस. त्याबद्दल काय सांगशील?
- होय, मला जेव्हा ‘कागर’ची आॅफर आली. तेव्हा मी नागराज (अण्णा) यांना भेटले. त्यांच्याशी चित्रपट आणि माझ्या भूमिकेबद्दल चर्चा केली. त्यांनी मला सांगितले की, दिग्दर्शक चांगले आहेत, स्क्रिप्ट चांगली आहे. करायला काहीच हरकत नाही.’ मग मी माझ्या आई-वडिलांची परवानगी घेतली. स्वत:चीही परवानगी घेतली आणि चित्रपट स्विकारला.

शुभंकर, तू म्हणालास की, काही गोष्टी तुला नव्याने शिकाव्या लागल्या? काय सांगशील?
- होय, हे खरे आहे. माझा हा पहिलाच चित्रपट. मोठे बॅनर, स्टारकास्ट, तसेच स्क्रिप्ट नवी असल्याने मला माझी भूमिका आव्हानात्मक वाटत होती. त्यासाठी मी काही गोष्टी नव्याने शिकायचे ठरवले. गावांत जाऊन काही लोकांसोबत चर्चा केली. तिथले प्रश्न, त्यांच्या चर्चा मी गावातच ऐकायचो. अंगणातील चर्चा तिथे स्वयंपाक घरातही व्हायच्या. त्यांची लाईफस्टाईलही मला आत्मसात करावी लागली.

रिंकू , दिग्दर्शक मकरंद माने यांच्याबद्दल क ाय सांगशील?
- ते एक खूप चांगले दिग्दर्शक आहेत. कोणतीही गोष्ट ते अगदी प्रेमाने आणि मनापासून समजावून सांगतात. आमच्या चित्रपटाच्या बाबतीत कित्येक भेटी व्हायच्या. त्या दरम्यान आमच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं. ते आम्हाला आमच्यातलेच वाटायचे. त्यांच्यासोबत काम करून खूप छान वाटतंय.


Web Title: Love and Politics's unique love story 'Kagar' !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.