‘आदर्श’ गावांमध्ये यंदा निवडणुकांचे फड का लागले?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 03:24 AM2021-01-14T03:24:59+5:302021-01-14T03:26:49+5:30

पोपटरावांचे हिवरेबाजार असो की भास्करराव पेरे-पाटील यांचे पाटोदा; अनेक ‘आदर्श’ गावांमध्ये विरोधी फळी उभी राहून निवडणुका लागल्या आहेत!

Why are elections in 'ideal' villages this year? | ‘आदर्श’ गावांमध्ये यंदा निवडणुकांचे फड का लागले?

‘आदर्श’ गावांमध्ये यंदा निवडणुकांचे फड का लागले?

googlenewsNext

सुधीर लंके

राज्यात आदर्श म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, पाटोदा या व इतर गावांमध्येही ग्रामपंचायत निवडणुकांचे फड रंगले आहेत. या आदर्श गावांतील बिनविरोध निवडणुकांची परंपरा का खंडित झाली? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. ज्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहावे, त्या गावांमध्ये काही चुकीचे घडले आहे किंवा घडते आहे का? तेथे विरोध का? अशी शंकाही या निमित्ताने उपस्थित होणे स्वाभाविक आहे. या गावांमध्ये जो प्रचार सुरू आहे, त्यात तेथील प्रस्थापित नेतृत्वावर आरोपही होत आहेत.

राळेगणसिद्धी हे अण्णा हजारे यांचे गाव. ग्रामविकासाचे रोल मॉडेल म्हणून राळेगण जगभर पोहोचले. या गावात १९७५ ते २०१० पर्यंत सलग ३५ वर्षे निवडणूक झाली नाही. गत दोन पंचवार्षिकला मात्र निवडणूक झाली. गतवेळच्या दोन्ही विरोधी पार्ट्यांनी यावेळी दिलजमाई करत बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न केला. मात्र, तरुणांची तिसरी फळी निवडणुकीत उतरली व निवडणूक लागली. पोपटराव पवार यांच्या हिवरेबाजारमध्येही पंचवीस वर्षांनंतर प्रथमच निवडणूक होत आहे. पवार हे आदर्श गाव समितीचे राज्य कार्याध्यक्ष आहेत. मात्र, यावेळी ते स्वत: निवडणुकीला सामोरे जात आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील भास्करराव पेरे पाटील हे ख्यातनाम सरपंच. २५ वर्षे ते सरपंच राहिले. यावेळी मात्र त्यांनी रिटायर्नमेंट घेतली. त्यांच्या विरोधी मंडळाचे आठ सदस्य बिनविरोध आले. पेरे पाटील स्वत:ही उभे नाहीत व त्यांनी पॅनलही उभे केले नाही. त्यांची मुलगी तेवढी उभी आहे. मात्र, ते तिच्याही प्रचारात नाहीत. गावात निवडणूक सुरू असताना, ते बाहेर व्याख्याने देण्यासाठी निघून गेले. एक प्रकारे त्यांनी सत्ता सोडून दिली.

म्हटले तर हे सगळे आश्चर्यकारक आहे. मात्र, या निवडणुका होणे म्हणजे भलतेच काही अघटित आहे, असा श्लेष काढणेही गैरच, उलट या गावांमध्ये निवडणुका होणे, संपूर्ण विचारांती व सर्वांना संधी देऊन पंचायत निवडणे, लोकांनी मतदानाचा हक्क बजावणे हे लोकशाहीला व या गावांच्या आदर्शाला धरूनच आहे. अर्थात, निवडणूक आहे, म्हणून उगीचच विरोधकांनी टीकाटिपण्णी करून, आजवरचा सर्व विकासच नाकारणे हाही कृतघ्नपणा ठरेल.
या गावांत निवडणुका का होत आहेत? याची काही ठळक कारणे दिसतात. एक तर वित्त आयोगांमुळे केंद्राचा पैसा थेट गावांच्या हातात येत असल्याने, सरपंच पदाला व पंचायतीला महत्त्व आले आहे. त्यात ही गावे आदर्श असल्याने तेथील प्रकल्प लवकर मंजूर होतात. राज्यपाल, मुख्यमंत्री अशी मंडळी ही गावे पाहायला येतात. राळेगणसिद्धीच्या सरपंचांना तर अण्णांच्या कुठल्याही आंदोलनात अण्णांच्या खालोखाल महत्त्व असते. गणपतराव औटी हे सरपंच असताना त्यातूनच लोकप्रिय झाले होते. सतत माध्यमांच्या गराड्यात असायचे. ज्या गावात काहीच विकास नाही, तेथे नवनिर्माण करणे अवघड आहे. आदर्श गावांमध्ये मात्र विकासाचे मॉडेल तयार आहे. त्यामुळे हे काम आपण पुढे नेऊ शकतो, असे नवीन नेतृत्वाला वाटू शकते. यातूनच महत्त्वाकांक्षा निर्माण होते.

सलग एकच व्यक्ती सत्तेत राहिली की, आपसूक विरोधक तयार होतात. तेच तत्त्व या गावांनाही लागू पडते. अण्णा हजारे स्वत: कधी निवडणुकीच्या भानगडीत पडत नाहीत. निवडणुकीचा निर्णय ते गावावर सोपवितात. त्यामुळे त्यांच्यावर टीका होण्याचा प्रश्नच येत नाही. कुणाचीही सत्ता आली, तर त्यांचा आपोआप अंकुशही राहतो. हिवरेबाजार व पाटोद्यात असे नाही. तेथे पोपटराव, पेरे पाटील स्वत: वर्षानुवर्षे सरपंच आहेत. परिणामी, सर्वांची मने सांभाळण्याची कसरत त्यांना करावीच लागते. पेरे यांनी निवृत्ती जाहीर करताना घोषणा केली की, ‘पदावर कोण बसते हे महत्त्वाचे नाही. जो पदावर बसेल त्याने गाव पुढे न्यावे’. त्यांची ही भूमिका समजूतदारपणाची आहे. 

पेरे पाटील गावात सक्तीने करवसुली करतात, अशी टीका त्यांचेवर झाली. पेरे मात्र कर आला नाही, तर गाव पुढे कसे जाणार? हा प्रश्न टीकाकारांना करतात. याचा दुसरा अर्थ असा की, आदर्श गावातील मतदारांनाही सवलती हव्या आहेत. कर घेणारे प्रशासन त्यांना नको आहे. हिवरेबाजारमध्ये दहशत आहे, असा आरोप पवारांच्या विरोधकांनी केला आहे. पवार म्हणतात, ‘आम्ही गत पंचवीस वर्षे ३१ डिसेंबरला ग्रामसभेत हिशेब मांडतो. तेथे दहशतीचा आरोप झाला नाही. मग निवडणुकीतच का?’ पवारांच्या या म्हणण्यातही तथ्य आहे. तात्पर्य, गावे आदर्श झाली, म्हणून तेथील सर्व राग, लोभ, हेवेदावे संपले असे नाहीत. ते निवडणुकांत उफाळतात. रस्ते, गटारे आदर्श करता येतात. मात्र, लोकशाहीत सर्वांनी मने आदर्श बनविणे अवघड असते.

(लेखक लोकमत अहमदनगर जिल्हा आवृत्ती प्रमुख आहेत)

Web Title: Why are elections in 'ideal' villages this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.