पाचपावलीत एकाची भीषण हत्या, दगडाने ठेचून केला ठार मारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 22:44 IST2021-06-07T22:44:20+5:302021-06-07T22:44:48+5:30
दगडाने ठेचून मारले - मृतक आणि मारेकऱ्याची ओळख पटली नाही

पाचपावलीत एकाची भीषण हत्या, दगडाने ठेचून केला ठार मारले
नागपूर - पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी व्यक्तीची अनोळखी आरोपींनी दगडाने ठेचून हत्या केली. कमाल चाैक, भाजी बाजार परिसरात सोमवारी रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली.
कमाल चौकाजवळ भरणाऱ्या भाजी बाजाराची ठरावी वेळ असल्याने सायंकाळनंतर भाजी बाजार परिसरात अंधाराचे साम्राज्य असते. तेथे भिकारी, कचरा वेचणारे आणि नशेखोर जमतात. ते तेथे वेगवेगळी नशा करत बसतात. सोमवारी रात्री अशाच प्रकारे एका जणाची आरोपीने दगडाने ठेचून हत्या केली. आरडाओरड ऐकून बाकीचे तेथून पळून गेले. रात्री ८.३० च्या सुमारास एकाने ही माहिती पोलिसांना कळविली. त्यानंतर पाचपावली पोलीस तेथे पोहचले. माहिती कळताच पोलीस उपायुक्त लोहित मतानी आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने तेथे आपापल्या ताफ्यासह पोहचले. वृत्त लिहस्तोवर मरणारा आणि मारणारा कोण ते स्पष्ट झाले नव्हते. पाचपावली आणि गुन्हे शाखेची पथके स्वतंत्रपणे मृतक आणि आरोपीची ओळख पटविण्यासाठी कामी लागली होती.
१० दिवसांतील दुसरी घटना
२८ मे च्या रात्री चौघांनी कपिल शशिकांत बेन (वय २०) नामक तरुणाची विटांनी ठेचून हत्या केली होती. या घटनेला १० दिवस झाले. तोच आता पुन्हा ही दगडाने ठेचून मारण्याची घटना घडली.