बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 09:43 IST2025-07-08T09:32:42+5:302025-07-08T09:43:23+5:30
हंसिका यादव तिचा प्रियकर प्रदीपसोबत सोमवारी दुपारी नवोदय नगरमध्ये फिरायला गेली होती. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला.

बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
हरिद्वारमधील सिडकुल औद्योगिक क्षेत्रात सोमवारी दुपारी एका प्रियकराने भरदिवसा आपल्या प्रेयसीचा चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तरुणीला रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी तरुणीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दोघांमध्ये झाली होती बाचाबाची
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळची आझाद नगर, नाथपुरी, सीतापूर येथील २२ वर्षीय हंसिका यादव तिचा प्रियकर प्रदीपसोबत सोमवारी दुपारी नवोदय नगरमध्ये फिरायला गेली होती. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दोघांमध्ये कोणत्यातरी क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. याच दरम्यान युवकाने खिशातून चाकू काढला आणि हंसिकाच्या गळ्यावर सपासप वार केले. हल्ला होताच तरुणी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळली.
चार वर्षांपासून सुरू होतं प्रेमप्रकरण
माहिती मिळताच सिडकुल पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तरुणीला रुग्णालयात घेऊन गेले, पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. ही तरुणी सिडकुलमधील एका खासगी कारखान्यात काम करत होती आणि नवोदय नगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होती. पोलीस तपासात समोर आले आहे की, हंसिकाचे आरोपी प्रदीपसोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. हा युवक अनेकदा तिला भेटायला येत असे. तो देखील सीतापूरचाच रहिवासी आहे.
आरोपीचा शोध सुरू
हरिद्वारचे एसएसपी प्रमेंद्र सिंह डोबाल यांनी सांगितले की, आरोपी युवकाची ओळख पटली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल कॉल डिटेल्सच्या आधारे पोलीस आरोपीच्या शोधात छापेमारी करत आहेत. त्यांनी सांगितले की, हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित असल्याचे दिसत आहे, परंतु तपासाअंतीच खरे कारण समोर येईल. मृत तरुणीच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. तरुणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात आहे.