क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 18:24 IST2025-06-23T18:23:18+5:302025-06-23T18:24:58+5:30

कार न मिळाल्याने दंतचिकित्सक पतीने आणि सासरच्या लोकांनी महिलेला बेदम मारहाण केली, ज्यात तिची मणक्याची हाडं मोडली.

Cruelty at its peak! Husband turns monstrous after not getting car as dowry; beats wife, breaks her spine and... | क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून हुंड्यासाठी एका महिलेला अमानुष त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कार न मिळाल्याने दंतचिकित्सक पतीने आणि सासरच्या लोकांनी महिलेला बेदम मारहाण केली, ज्यात तिची मणक्याची हाडं मोडली. यानंतर पतीने तिला तीन तलाक देऊन घरातून हाकलून दिले.

पीडित महिलेची पोलिसांत तक्रार
सआदतगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पीडित महिलेने तिचा पती शादाब अख्तर सिद्दीकी आणि सासरच्या मंडळींविरोधात हुंडाबळी आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तिने आपल्या दिरावर छेडछाडीचाही आरोप केला आहे. मार्च २०२१ मध्ये तिचा विवाह कॅम्बेल रोड येथील दंतचिकित्सक शादाब अख्तर सिद्दीकीशी झाला होता, असे तिने पोलिसांना सांगितले.

हुंड्यासाठी छळ आणि शारीरिक-मानसिक त्रास
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या माहेरून लग्नात ५ लाख रुपये रोख, दागिने आणि इतर वस्तू हुंडा म्हणून देण्यात आल्या होत्या. असे असूनही, लग्नानंतर पती आणि सासरचे लोक सतत कारची मागणी करत होते. या मागणीवरून ते तिला दररोज शारीरिक आणि मानसिक त्रास देत असत. सासू आणि दीर तिला खराब जेवण देत असत आणि सतत टोमणे मारत असत, असेही तिने म्हटले आहे.

बेदम मारहाणीत मणक्याचे हाड मोडले
पीडितेने सांगितले की, तिच्या दिराने अनेक वेळा तिच्याशी अश्लील वर्तन केले. त्याला विरोध केल्यावर तो पळून गेला. याबाबत तिने पती आणि सासूकडे तक्रार केली असता, त्यांनी तिला गप्प राहण्याचा सल्ला दिला आणि तलाक देण्याची धमकी दिली. पतीने दारूच्या नशेत तिच्यासोबत जबरदस्ती केल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. एका दिवशी त्याने तिला इतकी मारहाण केली की, तिच्या मणक्याचे हाड मोडले.

घरातून हाकलून दिले आणि 'तीन तलाक'
या घटनेनंतर तिला आणि तिच्या लहान मुलीला घरातून हाकलून देण्यात आले, असा आरोप पीडितेने केला आहे. ती माहेरी असताना तिचा पती पुन्हा कारच्या मागणीसाठी तिच्या माहेरी आला. कुटुंबीयांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकला नाही आणि तीन वेळा तलाक बोलून निघून गेला. या प्रकरणी, महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Cruelty at its peak! Husband turns monstrous after not getting car as dowry; beats wife, breaks her spine and...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.