Team India Test Opener Mayank Agarwal share his childhood photo, svg | टीम इंडियाच्या ओपनरला ओळखलंत का? ऑस्ट्रेलियात पदार्पण करताना मोडलेला ७१वर्षांपूर्वीचा विक्रम

टीम इंडियाच्या ओपनरला ओळखलंत का? ऑस्ट्रेलियात पदार्पण करताना मोडलेला ७१वर्षांपूर्वीचा विक्रम

कोरोना व्हायरसमुळे सध्या क्रीडा विश्व थांबलं आहे. जगभरातील अनेक मोठ्या स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे खेळाडूही एकांतवासात गेले आहेत. त्यांनी स्वतःला आपापल्या घरी कोंडून घेतले आहे. शक्यतो ते सार्वजनिक ठिकाणी फिरणेही टाळत आहेत. त्यामुळे घरी बसून नेमकं काय करावं हेच त्यांना सुचेनासे झाले आहे. काहींनी त्यावर तोडगा शोधला आहे. इंडियन प्रीमिअर लीगही ( आयपीएल २०२०) पुढे ढकलण्यात आल्यानं अनेक क्रिकेटपटू घरी राहणेच पसंत करताना दिसत आहेत. मग, घरी बसून जुने अल्बम चाळण्याचं काम, ते करत आहेत आणि अशाच एका जुन्या अल्बममधून टीम इंडियाच्या सलामीवीराचा फोटो समोर आला आहे. हा फोटो पाहून भारताचा हा सलामीवीर कोण, हे भल्याभल्या क्रिकेटप्रेमीलाही सांगता येणार नाही.

नोव्हेंबर २०१७मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावून हा खेळाडू चर्चेत आला. रणजी करंडक स्पर्धेच्या २०१७-१८च्या हंगामात त्यानं महाराष्ट्राच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. त्याच महिन्यात त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पाही ओलांडला होता. ११६० धावांसह रणजी करंडकाच्या त्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो अव्वल होता. २०१८मध्ये विजय हजारे चषक स्पर्धेतही सर्वाधिक धावा त्यानं नावावर केल्या. स्थानिक क्रिकेटमध्ये त्यानं २०१८मध्ये सर्वाधिक २१४१ धावा केल्या आणि बीसीसीआयनं त्याला माधवराव सिंधीया पुरस्कारानं त्याचा गौरव केला.

सप्टेबंर २०१८मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची टीम इंडियात निवड झाली, परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. डिसेंबर २०१८मध्ये ऑस्ट्रेलिया दौरा त्याच्यासाठी कलाटणी देणारा ठरला. पृथ्वी शॉला अचानक दुखापत झाली आणि या फलंदाजानं कसोटीत पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात ७६ धावांची खेळी करून त्यानं ७१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पणात सर्वोत्तम वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम त्यानं नावावर करताना दत्तू फडकर यांचा ५१ धावांचा विक्रम मोडला. त्यानंतर त्यानं ११ कसोटी सामन्यांत ५७.२९ च्या सरासरीनं ९७४ धावा चोपल्या आहेत. त्यात दोन द्विशतकांचा समावेश आहे. 


आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की तो खेळाडू कोण? हा फोटो कर्नाटकच्या मयांक अग्रवालचा आहे. नुकत्याच झालेल्या आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मासह त्यानं दमदार फलंदाजी केली होती. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सलग दोन सामन्यांत त्यानं शतक झळकावले होते. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या कसोटीतही त्यानं द्विशतक झळकावले. मयांकने गुरुवारी त्याचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 रद्द झाल्यास MS Dhoniसह तीन खेळाडूंना मोठा फटका!

ऑलिम्पिक आयोजनासाठी ठोस तोडगा नाहीच, कोरोना संक्रमण ठरतोय मोठा अडथळा

Web Title: Team India Test Opener Mayank Agarwal share his childhood photo, svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.