महिला प्रीमिअर लीगचा दुसरा हंगाम अंतिम टप्प्यान येऊन ठेपला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना होण्यासाठी अवघ्या ५ दिवसांचा कालावधी उरला आहे. पण, अद्याप प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या तिसऱ्या संघाचे नाव समोर आले नाही. आयपीएलमध्ये चार संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतात.
पण WPL मध्ये काहीसे वेगळे असून इथे केवळ तीन संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात. गुणतालिकेत प्रथम स्थान मिळवणारा संघ थेट अंतिम सामना खेळतो.
उर्वरित दोन संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळला जातो. आता दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. मात्र अद्याप एक जागा रिक्त आहे.
सोमवारी यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना झाला. जो गुजरातने ८ धावांनी जिंकला. खरं तर या सामन्याने गुणतालिकेत फारसा फरक पडला नाही. पण प्लेऑफच्या शर्यतीवर नक्कीच परिणाम झाला आहे. आतापर्यंत कोणताही संघ अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडलेला नाही. पण तिसरा संघ म्हणून पात्र ठरण्याची सर्वाधिक शक्यता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची आहे.
आज मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. जर आरसीबीने हा सामना जिंकला तर त्यांना थेट प्लेऑफमध्ये प्रवेश मिळेल. मात्र, जर बंगळुरूने हा सामना गमावला तर प्रकरण नेट रन रेटवर येईल.
सध्या आरसीबीचा नेट रन रेट चांगला आहे. पण गुजरात जायंट्सचा अजून एक सामना बाकी आहे. दुसरीकडे RCB वाईट रीतीने हरली आणि गुजरातनेही आपला सामना गमावला (गुजरातचा नेट रन रेट खूपच खराब आहे). अशा स्थितीत यूपी वॉरियर्सचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो.
दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांनी प्रत्येकी ७ सामने खेळले असून ५ विजय मिळवले आहेत आणि त्यांचे गुण १० आहेत. दिल्लीचा नेट रन रेट जास्त असल्यामुळे ते पहिल्या क्रमांकावर तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे, आरसीबीचा संघ ६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
१५ मार्च रोजी एलिमिनेटर आणि महिला प्रीमिअर लीग २०२४ चा अंतिम सामना १७ मार्च रोजी दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.