भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या आगामी ICC टी२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी भारतीय टी२० संघाची घोषणा केली. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत स्पर्धेचे सामने खेळवण्यात येणार आहेत.
या बड्या स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेल उपकर्णधार असणार आहे. फलंदाजीत सतत अपयशी ठरणाऱ्या शुबमन गिलला संघाबाहेर करण्यात आले आहे. संजू सॅमसन आणि इशान किशन या दोन सलामीवीरांना संघात स्थान मिळाले आहे.
इशान किशन गेली कित्येक महिने संघाचा भाग नव्हता. त्याला बऱ्याच काळानंतर टीम इंडियात परतण्याची संधी मिळाली. तो इतके दिवस संघात का नव्हता, त्याला संघात न घेण्याची काय कारणे होती, याचे उत्तर संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकरने दिले.
इशान किशनबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित आगरकर म्हणाला, 'इशान किशन हा टी२० क्रिकेटमध्ये वरच्या फळीत खेळतो. सध्या तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तो टीम इंडियासाठी आधीही खेळला आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याने द्विशतक ठोकले आहे.'
'निर्धारित षटकांच्या सामन्याचा त्याला पुरेसा अनुभव आहे. यापूर्वी तो काही काळ संघात दिसला नाही हे खरे आहे. त्याचे कारण भारताकडे ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल हे दोन पर्याय होते. हे दोन्ही पर्याय त्यावेळी इशान किशन पेक्षा जास्त चांगले आणि सक्षम होते.'
'सध्या इशान किशन स्वतः खूप चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे त्याला संघात निवडण्यात आले आहे. सलामीवीराच्या भूमिकेत तो खूप चांगल्या पद्धतीने फिट बसतो. स्पर्धेत कुणाला काही दुखापत झाली तर संघात पर्याय असावेत असा संघ आम्ही निवडला आहे.'