मोहम्मद शमी ऑन फायर! १६ वर्षानंतर भारतात नोंदवला गेला असा पराक्रम, ५ मोठे विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात मोहम्मद शमीने ( Mohammed Shami) ५ विकेट्स घेत भारताला मोठे यश मिळवून दिले. एकवेळ असं वाटत होतं की कांगारू सहज ३००+ धावा उभ्या करतील, परंतु शमीच्या भेदक माऱ्याने त्यांना हतबल केले. ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत सर्वबाद २७६ धावाच करता आल्या.

मोहम्मद शमीने १० षटकांत १ निर्धाव षटक फेकताना ५१ धावांवर ५ विकेट्स घेतल्या. या कामगिरीनसह शमीने अनेक विक्रम नावावर केले. भारताकडून ९३ वन डे सामन्यात सर्वाधिक १७० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचा मान त्याने पटकावला.

मोहम्मद शमीने आज ५१ धावांत ५ विकेट्स घेतल्या आणि त्याची ही वन डेतील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. यापूर्वी २०१९मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध ६९ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्याआधी वेस्ट इंडिज ( ४-१६ ) आणि पाकिस्तान ( ४-३५) विरुद्ध त्याची सर्वोत्तम गोलंदाजी होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी ३७ बळींसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने अजित आगरकर ( ३६), जवागल श्रीनाथ ( ३३) व हरभजन सिंग ( ३२) यांना मागे टाकले. या विक्रमात कपिल देव ४५ विकेट्ससह अव्वल स्थानी आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीत मोहम्मद शमी तिसरा आला आहे., कपिल देव यांनी १९८३ मध्ये ट्रेंट ब्रिज येथे ४३ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. अजित आगरकरने २००४ मध्ये मेलबर्नवर ४२ धावांत ६ विकेट्स घेतलेल्या.

भारतीय खेळपट्टींवरी २००७ मध्ये वन डेत पाच विकेट्स घेणारा जहीर खान ( वि. श्रीलंका) हा शेवटचा जलदगती गोलंदाज होता. १६ वर्षांनंतर मोहम्मद शमीने हा पराक्रम करून दाखवला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये भारतीय सलामीवीरांनी सर्वाधिक १७ शतकी भागीदारी केल्या आहेत. भारताने आज इंग्लंडचा ( १६) विक्रम मोडला. शुबमन गिल व ऋतुराज यांनी १४२ धावांची भागीदारी केली.