भारताने फक्त मॅच नाही, तर 'सुवर्णसंधी' गमावली; खूश झाले पाकिस्तानी!

बांगलादेशविरुद्ध आशिया चषक स्पर्धेतील भारताच्या पराभवाने पाकिस्तानला खूप आनंद झालाय... कारण तसा त्यांचा फायदाच झालाय...

आशिया चषक २०२३ स्पर्धेतील भारतीय संघाची अपराजित मालिका बांगलादेशने खंडीत केली. सुपर ४ च्या असेरच्या साखळी सामन्यात बांगलादेशने ६ धावांनी सामना जिंकला आणि स्पर्धेचा निरोप घेतला. या निकालाचा भारतीय संघाच्या फायनल मधील मार्गावर काही परिणाम झालेला नसला तरी एक सुवर्णसंधी नक्की हुकली आहे.

२६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुबमन गिलच्या ( १२१) शतकानंतर अक्षर पटेलने ( ४२) मोर्चा सांभाळला होता, परंतु मुस्ताफिजूर रहमानने ४९व्या षटकात दोन धक्के दिले अन् बांगलादेशचा विजय पक्का केला. बांगलादेशने आशिया चषकात भारतावर एकमेव विजय २०१२ साली मिळवला होता आणि ११ वर्षानंतर भारतावर त्यांनी विजय मिळवला.

भारताने हा सामना जिंकला असता तर ते आयसीसी वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचले असते. कारण, दक्षिण आफ्रिकेनेही चौथ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून टीम इंडियाची मदत केली होती. भारतीय संघ सध्या ट्वेंटी-२० व कसोटी क्रमवारीत नंबर वन आहे आणि त्यांना वन डेतही टॉपर बनण्याची संधी होती.

बांगलादेशविरुद्धच्या लढतीपूर्वी भारतीय संघ ११६ रेटींग पॉईंट्सस दुसऱ्या क्रमांकावर होते, तर ऑस्ट्रेलिया ११८ रेटींग पॉईंटसह अव्वल स्थानी होते. पण, बांगलादेशविरुद्धच्या पराभवाने भारताने ही संधी गमावली आणि ते आता ११४ रेटींग पॉईंट्ससह तिसऱ्या स्थानावर घसरले आहेत.

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान समान ११५ रेटींग पॉईंट्ससह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलियाला पाचव्या वन डेत पराभव पत्करावा लागला आणि भारताने आशिया चषक जिंकला, तरी टीम इंडिया आता नंबर १ बून शकत नाही. पण, तेच ऑस्ट्रेलिया हरली तर पाकिस्तान पुन्हा नंबर १ टीम बनेल.

पाकिस्तानचा संघ आता थेट वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहे, परंतु ऑस्ट्रेलियाचा संघ २२ सप्टेंबरपासून भारताविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पुन्हा नंबर १ बनण्याची संधी आहे. तुर्तास तरी टीम इंडियाने वन डे क्रमवारीत नंबर १ बनण्याची आयती संधी गमावली आहे.