आशिया कप अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट टीमने पाकिस्तानला धूळ चारली. त्यानंतर विजयी सोहळ्यात असे चित्र पाहायला मिळाले, जे क्रिकेटच्या इतिहासात याआधी कधी घडले नाही. टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि इतर खेळाडूंनी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला.
टीम इंडियाच्या या निर्णयानंतर नकवी ट्रॉफी त्यांच्यासोबतच घेऊन निघून गेले. त्यानंतर भारतीय संघानेही विना ट्रॉफी हातात घेता विजयी जल्लोष केला. नकवी यांच्या या कृत्यावरून फक्त क्रिकेट जगतात चर्चा नाही, तर राजकीय खळबळही उडाली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आयसीसी बैठकीत नकवी यांच्या कृत्याचा विरोध करू असं बीसीसीआयने म्हटलं आहे.
सूत्रांनुसार, सामन्यानंतर भारतीय खेळाडूंना सांगण्यात आले की, पाकिस्तानी गृहमंत्री आणि पीसीबी मुख्य मोहसिन नकवी यांच्या हस्ते विजयी ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे. मात्र टीम इंडियाने त्याला साफ नकार दिला. ट्रॉफी इतर कुठल्या मान्यवरांकडून घेऊ परंतु नकवी यांच्याकडून नाही, कारण ते सातत्याने भारतविरोधी विधाने करत असतात असं खेळाडूंनी म्हटलं.
तर दुसरीकडे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून मीच ट्रॉफी देणार असा हट्ट नकवी यांनी केला. या वादात जवळपास १ तासापर्यंत विजयी सोहळ्याला विलंब झाला. अखेर भारतीय टीमने ट्रॉफी घेतल्याशिवाय स्टेडिअममध्ये जल्लोष केला. तेव्हा नकवी ट्रॉफी घेऊन मंचावरून निघून गेले.
ज्या देशाने आमच्या देशाविरोधात युद्ध छेडले, त्यांच्याकडून भारत ट्रॉफी स्वीकारणार नाही. हा फक्त खेळ नाही, तर राष्ट्रीय प्रतिमेचा प्रश्न आहे. आम्ही एसीसी अध्यक्षाकडून ट्रॉफी न घेण्याचा निर्णय घेतला, जे पाकिस्तानी प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्याचा अर्थ त्यांनी ट्रॉफी आणि मेडल सोबत घेऊन जावे असं नाही असा टोला बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी लगावला.
ट्रॉफी आणि खेळाडूंची मेडल घेऊन जाणे हे दुर्दैवी आहे. आम्हाला आशा आहे लवकरच ट्रॉफी आणि पदक भारताला दिले जातील. नोव्हेंबर महिन्यात आयसीसी क्रिकेट संमेलन होणार आहे. त्यात एसीसी अध्यक्ष नकवी यांच्या केलेल्या कृत्याचा आम्ही कडाडून विरोध करू असंही बीसीसीआयने म्हटलं आहे.
कोण आहेत मोहसिन नकवी? - नकवी हे सध्या एसीसीचे अध्यक्ष आहेत, त्याशिवाय ते पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे प्रमुख आणि पाकिस्तान सरकारमधील गृहमंत्री आहेत. ते कट्टर भारतविरोधी म्हणून ओळखले जातात. नकवी यांनी बऱ्याचवेळी भारत आणि इथल्या पंतप्रधानाविरोधात आक्रमक विधाने केली आहेत.
ऑपरेशन सिंदूरवेळी भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवादी तळांना टार्गेट केले. त्यात मोठ्या प्रमाणात दहशतवादी मारले गेले. या हल्ल्याने बिथरलेल्या मोहसिन नकवी यांनी भारताविरोधात वादग्रस्त विधान केले होते. पाकिस्तानात अनेक सभेत त्यांनी भारताला आव्हान देण्याची भाषा वापरली आहे.
पाकिस्तानी वायू सेनेने भारतीय लढाऊ विमाने पाडली असा खोटा दावाही मोहसिन नकवी यांनी केला होता. एका पत्रकार परिषदेत त्यांनी भारताविरोधात विधान करत त्यांना जागा दाखवली असून, भारताची सुपर पॉवरची प्रतिमा पाकिस्तानने उद्ध्वस्त केली असं त्यांनी म्हटलं होते.
दरम्यान, केवळ खोटी विधानेच नाही तर जागतिक व्यासपीठावरही मोहसिन नकवी भारतावर टीका करतात. दहशतवादाविरोधात कारवाई करण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप नकवी यांच्यावर आहे. कायम त्यांच्या भाषणातून ते भारताला टार्गेट करतात.