मुंबई इंडियन्स फ्रँचायझी म्हणजे प्रतिभावंत खेळाडू निर्माण करणारा कारखानाच. संघाच्या मालकीण बाई नीता अंबानी यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबई इंडियन्स फ्रँचायझीनं टीम इंडियाला दिलेल्या हिऱ्यांची स्टोरी शेअर केली होती. यात मॅगी खाऊन दिवस काढणाऱ्या हार्दिक पांड्यापासून ते जागतिक स्तरावर गाजावाजा असलेल्या जसप्रीत बुमराहचा त्यांनी उल्लेख केला होता. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीची ही गोष्ट फक्त पुरुष क्रिकेटपुरती मर्यादीत नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१६ वर्षांच्या पोरीनं स्मृतीच्या आरसीबीला घरच्या मैदानावर रडवलं
महिला प्रिमीअर लीगमध्येही मुंबई इंडियन्सचा संघ हाच पॅटर्न फॉलो करताना दिसतोय. जी कमालीनीच्या जबरदस्त एन्ट्रीमध्ये ती झलक पाहायला मिळते. नीता अंबानींनी WPL लिलावात ज्या १६ वर्षीय पोरीला कोरडपती केलं ती आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून धमाका करताना दिसतीये. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स विरुद्ध स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात शुक्रवारी WPL मधील एक रंगतदार सामना पाहायला मिळाला. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेला सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झाला. या सामन्यात १६ वर्षीय पोरीनं खणखणीत चौकार मारत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला. तिचा हा फटका स्मृती मानधनाच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला घरच्या मैदानावर रडवणारा ठरला.
जी कमालिनीची कमाल; मुंबईच्या ताफ्याला मिळालेली नवी 'हिरोईन'च
एलिस पेरीच्या ४३ चेंडूतील ८१ धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्यांदा बॅटिंग करताना रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु महिला संघानं मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात १६७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स महिला संघाकडून नॅटली सायव्हर ब्रंट ४२ (२१) च्या दमदार खेळीनंतर कॅप्टन हरमनप्रीत कौरनं ५०(३८) अर्धशतकी खेळी केली. याशिवाय अमरजोत कौरनं २७ चेंडूत नाबाद ३४ धावा काढल्या. अखेरच्याषटकात १६ वर्षीय जी कमालीनी हिने आपल्यावर करोडोची लागलेली बोली एकदम योग्य होती ते दाखवून दिले. बॉल टू रन अशा दबावाच्या परिस्थितीत चौकार मारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
चेन्नई सुपर किंग्सच्या अकादमीत प्रॅक्टिस अन् मुंबई इंडियन्सकडून जलवा
जी कमालीनी ही तमिळनाडूची असून ती एक ऑलराउंडर खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून दिसणाऱ्या या छोरीचे चेन्नई सुपर किंग्स संघाशीही खास कनेक्शन आहे. कारण ती चेन्नईच्या अकादमीत प्रॅक्टिस करते. अंडर १९ वर्ल्ड कप संघातील प्रमुख सदस्य असलेली जी कमालीनी WPL लिलावात १० लाख या मूळ किंमतीसह सहभागी झाली होती. मुंबई इंडियन्सच्या संघानं तिच्यासाठी १.६ कोटी रुपयांची बोली लावली होती. यंदाच्या हंगामात पदार्पणाचा सामना खेळताना तिनं इतिहास रचला होता. ती WPL च्या इतिहासातील सर्वात तरुण महिला खेळाडू ठरली आहे.