आयपीएल सामना पाहण्यासाठी गेलेल्या एका महिलेचे मोठे नुकसान झाले. स्टेडियममध्ये रील शूट करताना संबंधित महिलेच्या हातातून अंगठी निसटून खाली पडली, ज्याची किंमत ७० हजार असल्याचे सांगण्यात आले आहे. "जर ही अंगठी कुणाला सापडली, तर कृपया ती परत करा," अशी विनंती संबंधित महिलेने केली आहे. ही घटना पंजाबच्या महाराजा यादविंद्र सिंग पीसीए स्टेडियमवर घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, एक महिला स्टेडियमच्या स्टँड्समध्ये उभी राहून मोबाईलवर रील बनवत होती. व्हिडिओसाठी पोझ देत असताना आणि हात हवेत उंचावत असताना, अचानक तिच्या हातातील महागडी अंगठी निसटली. गर्दी आणि गोंधळामुळे ती अंगठी नेमकी कुठे पडली, याचा शोध घेणे कठीण झाले. या घटनेचा व्हिडिओ 'Loss ho gaya' या कॅप्शनसह सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये महिला अंगठी पडल्यानंतर हतबल झालेली दिसत आहे.
सोशल मीडियासाठी व्हिडिओ बनवण्याच्या नादात महिलेने तब्बल ७० हजार रुपये किंमतीची अंगठी गमावली आहे. या व्हिडीओवर अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत, तर काहींनी सावधगिरी बाळगायला हवी होती असा सल्लाही दिला आहे. गर्दीच्या ठिकाणी किंवा स्टेडियमसारख्या सार्वजनिक जागेत मौल्यवान वस्तू सांभाळणे आवश्यक आहे, असे काहींनी म्हटले आहे. तर, केवळ सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची जोखीम घेणे महागात पडू शकते, असाही टोला काहींनी लगावला आहे.