Join us

टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरचा मैत्रिणीनेच केला विश्वासघात! २५ लाखांची फसवणूक, दागिनेही गायब

Team India cricketer cheated by Friend: टीम इंडियाकडून २००हून जास्त सामने खेळलेल्या क्रिकेटरला लुटलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 11:28 IST

Open in App

Team India cricketer cheated by Friend, Deepti Sharma: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू आणि उत्तर प्रदेश पोलिस उपअधीक्षक (DSP) दीप्ती शर्मा संबंधित लाखो रुपयांच्या फसवणुकीचा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे दीप्तीला तिच्या मैत्रिणीनेच फसवले आहे. दीप्तीची जवळची मैत्रीण आणि सहकारी क्रिकेटपटू आरुषी गोयल आणि तिच्या कुटुंबावर २५ लाख रुपयांची फसवणूक आणि चोरीचा आरोप आहे. या प्रकरणात दीप्तीचा भाऊ सुमित शर्माने आग्रा येथील पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मैत्रिणीने केला विश्वासघात

दीप्ती शर्माची मैत्रीण आणि ज्युनियर क्रिकेटपटू आरुषी गोयलने तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, दीप्तीने आरुषी आणि तिच्या कुटुंबाला २५ लाख रुपये उधार दिले होते, परंतु जेव्हा तिने पैसे परत मागितले तेव्हा आरुषी आणि तिच्या पालकांनी पैसे परत करण्यास नकार दिला. तसेच तिलाही असभ्य वागणूक देण्यात आली.

रोख रक्कम, परकीय चलन, दागिनेही चोरी

दीप्तीच्या फ्लॅटमधून रोख रक्कम आणि परकीय चलनही चोरीला गेले आहे. आरोपात म्हटले आहे की, दीप्ती शर्माचा आग्रा येथील राजेश्वर मंदिराजवळ एक फ्लॅट आहे, जिथे आरुषी गोयल अनेकदा येत असे. २२ एप्रिल रोजी ती गुपचूप फ्लॅटमध्ये आली आणि सोन्या-चांदीचे दागिने, अडीच हजार डॉलर्स आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन गेली. आग्राचे डीसीपी सोनम कुमार यांनी पुष्टी केली की या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि कसून तपास सुरू आहे.

कोण आहे क्रिकेटर आरुषी गोयल?

२७ वर्षीय आरुषी गोयल महिला प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्सचा भाग राहिली आहे. या संघाची कर्णधार दीप्ती शर्मा आहे. या दोघींमधील मैत्री क्रिकेटच्या मैदानापासूनच सुरू झाली. आरुषी गोयल ही रेल्वेमध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क आहे आणि ती आग्रा कॅन्ट रेल्वे स्टेशन, आग्रा रेल्वे डिव्हिजन येथे तैनात आहे. ती इंडिया अ संघाचाही भाग राहिली आहे. दीप्ती शर्मा ही टीम इंडियाच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. आतापर्यंत तिने ५ कसोटी, १०६ एकदिवसीय आणि १२४ टी२० सामने खेळले आहेत.

टॅग्स :चोरीगुन्हेगारीभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघधोकेबाजीउत्तर प्रदेश