Join us

ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण

Team India vs Australia, ICC Test Rankings: कसोटी क्रमावारीत ऑस्ट्रेलियन संघ अव्वल असला तरी वनडे, टी20मध्ये भारताने बाजी मारली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 18:25 IST

Open in App

Team India vs Australia, ICC Test Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शुक्रवारी वार्षिक क्रमवारी जाहीर केली. यामध्ये ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर आहे, तर भारताने वनडे आणि टी20 या दोन्ही प्रकारांमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. गतवर्षी ओव्हल येथे झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या विजेतेपदाच्या सामन्यात विद्यमान कसोटी विजेत्या ऑस्ट्रेलियाने भारतावर २०९ धावांनी शानदार विजय नोंदवला होता. त्यामुळे भारताला मागे टाकून कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान पटकावले आहे. कसोटी क्रमवारीत टीम इंडियाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. पण वनडे आणी टी20मध्ये भारताने आपले अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे.

कसोटी क्रमवारीत अव्वल असलेल्या ऑस्ट्रेलियाचे आता 124 गुण आहेत. तर भारतीय संघ ४ गुणांनी मागे असून 120 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. यादीत तिसऱ्या स्थानी इंग्लंड (105), चौथ्या दक्षिण आफ्रिका (103), न्यूझीलंड (96) पाचव्या, पाकिस्तान (89) सहाव्या, श्रीलंका (83) सातव्या, वेस्ट इंडिज (82) आठव्या आणि बांगलादेश (53) नवव्या स्थानी विराजमान आहे.

वार्षिक अपडेटमध्ये 2020-21 हंगामातील निकाल वगळण्यात आले आहेत आणि मे 2021 नंतर पूर्ण झालेल्या सर्व मालिका समाविष्ट केल्या आहेत. 2020-21 मध्ये भारत ऑस्ट्रेलियाशी 2-1 असा जिंकला होता. पण भारताचा हा विजय या क्रमवारीत ग्राह्य धरला जात नसल्याने भारत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. क्रमवारीत स्थान मिळवण्यासाठी संघांना तीन वर्षांत किमान आठ कसोटी सामने खेळावे लागतात.

दरम्यान, भारत वनडे आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल आहे. यामध्ये मे 2023 पूर्वी पूर्ण झालेल्या सामन्यांसाठी 50 टक्के गुण आणि त्यानंतर पूर्ण झालेल्या सामन्यांसाठी 100 टक्के गुणांचा समावेश आहे. भारत 122 गुणांसह अव्वल तर ऑस्ट्रेलिया 116 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तिसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका (112), चौथ्या स्थानी पाकिस्तान (106), पाचव्या स्थानी न्यूझीलंड (101), सहाव्या स्थानी इंग्लंड (95), सातव्या क्रमांकावर श्रीलंका (93), आठव्या स्थानी बांगलादेश (86), नवव्या स्थानी अफगाणिस्तान (80) आणि दहाव्या स्थानी वेस्ट इंडिजचा (69) संघ आहे.

T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत भारत 264 गुणांसह अव्वल आहे. तर ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडला खाली ढकलले आहे. दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानावर असून न्यूझीलंडचा संघ पाचव्या स्थानी विराजमान आहे.

टॅग्स :आयसीसीआॅस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघवन डे वर्ल्ड कपभारतीय क्रिकेट संघ