Rohit Sharma vs Babar Azam, IND vs PAK : पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझमची वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील कामगिरी खूपच खराब झाली. त्याने तीन सामन्यांमध्ये फक्त ५६ धावा केल्या. फलंदाजीतील त्याच्या फ्लॉप शो मुळे भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला खुशखबर मिळाली. रोहित शर्माआयसीसी एकदिवसीय क्रमवारीत कोणताही सामना न खेळता दुसऱ्या स्थानावर पोहोचला, तर बाबर आझम तिसऱ्या स्थानावर घसरला.
रोहित शर्माने बाबर आझमला मागे टाकले, गिल अव्वल
भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिल आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्याचे रेटिंग ७८४ आहे. भारताचा रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याचे रेटिंग ७५६ आहे. हे दोन्ही खेळाडू शेवटचे २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसले होते. या स्पर्धेत शुभमन गिलने ५ सामन्यांमध्ये ४७ च्या सरासरीने १८८ धावा केल्या, तर रोहित शर्माने पाच सामन्यांमध्ये ३६ च्या सरासरीने १८० धावा केल्या. रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा बाबर आझम आहे, ज्याचे रेटिंग ७५१ आहे.
टॉप १० मध्ये भारताचा बोलबाला
गिल आणि रोहितव्यतिरिक्त भारताचा विराट कोहली चौथ्या स्थानावर आहे. विराटचे रेटिंग ७३६ आहे. श्रेयस अय्यरचाही टॉप १० मध्ये समावेश आहे. तो ७०४ च्या रेटिंगसह रँकिंगमध्ये आठव्या स्थानावर आहे. आयसीसीच्या टॉप १० फलंदाजांच्या रँकिंगमध्ये भारत हा एकमेव संघ आहे, ज्या संघाचे चार फलंदाज समाविष्ट आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता हे दोघेही फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळतील. भारताला आता ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. त्यात हे दोघे खेळताना दिसू शकतील.