Syed Mushtaq Ali Trophy 2024, Maharashtra vs Mumbai, Group E : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात पुणेकर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र संघाला ५ विकेट्सनं पराभूत केले आहे. मुंबई संघाचा देशांतर्गत टी-२० स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय असून सलग दोन विजयानंतर महाराष्ट्राच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
CSK च्या ताफ्यातील पुणेकरांचा महाराष्ट्राकडून फ्लॉप शो
बुधवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना महाराष्ट्राच्या संघाने निर्धारित २० षटकात ९ बाद १७१ धावा केल्या होत्या. पुणेकर ऋतुराजवर महाराष्ट्राच्या संघाची मोठी भिस्त आहे. कॅप्टन्सीसोबतच त्याच्याकडून फलंदाजीत दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. मुंबई विरुद्धच्या सामन्यात त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. अवघ्या १९ धावांवर शार्दुल ठाकूरनं त्याची विकेट घेतली. त्याच्याशिवाय राहुल त्रिपाठीही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. ही पुणेरी जोडी आयपीएलच्या आगामी हंगामात चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातून खेळताना दिसणार आहे.
ऋतुराज पाठोपाठ राहुल त्रिपाठीही स्वस्तात
ऋतुराज गायकवाड तंबूत परतल्यावर राहुल त्रिपाठीनं २ खणखणीत चौकार आणि एका षटकारासह आपला आक्रमक अंदाज दाखवला. पण तो फार काळ टिकला नाही. ६ चेंडूत १६ धावा करून तोही तंबूत परतला. महाराष्ट्राच्या संघातील हे दोन स्टार स्वस्तात माघारी फिरल्यावर अझिम काझी ३२(२३) आणि निखिल नाईक ४७(३८) यांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने धावफलकावर १७१ धावा लावल्या होत्या.
श्रेयस अय्यर अन् अजिंक्यची जोडी जमली, मुंबईकरांनी मॅज जिंकली
या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई संघाची सुरुवात खराब झाली. मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉप पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. अंगकृष्ण रघुवंशीही २१ धावा करून माघारी फिरला. पहिल्या दोन विकेट्स स्वस्तात गमावल्यानंतर कॅप्टन श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे ही जोडी जमली. दोघांनी ११० धावांची भागीदारी करत सामना मुंबईच्या बाजूनं सेट केला. अय्यरनं ३९ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७१ धावांची दमदार खेळी केली. दुसऱ्या बाजूला रहाणेनं ३४ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावांच्या खेळीसह त्याला उत्तम साथ दिली. एका बाजूला पुणेकर ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी ही जोडी फ्लॉप ठरली. दुसरीकडे मुंबईकर अय्यर आणि रहाणे जोडीनं फिफ्टी झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
खांदे पालट झाली पण जोडीतील गोडी कायम
रणजी ट्रॉफी स्पर्धेत श्रेयस अय्यर हा अंजिक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई संघात खेळताना दिसला होता. आता टी-२० क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली अजिंक्य रहाणे खेळताना दिसतोय. कॅप्टन्सी बदलाच्या प्रयोगानंतर सूर जुळणार का? अशी चर्चा पाहायला मिळते. पण या जोडीनं महाराष्ट्र संघाविरुद्धच्या लढतीत एकमेकांच्या साथीनं दमदार खेळी करत खांदे पालट झाल्याचा काही फरक पडत नसल्याचे दाखवून देत मुंबईकर जोडी हिट है... शो दाखवून दिल्याचे दिसते.