Pm Modi Letter to Smriti Mandhana marriage with Palash Muchhal: टीम इंडियाची स्टार फलंदाज आणि वर्ल्ड चॅम्पियन क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिने अनोख्या पद्धतीने आपल्या साखरपुड्याची घोषणा केली. इंस्टाग्रामवर एक रील व्हिडीओ शेअर करत आपल्या टीम इंडियाच्या निवडक सहकाऱ्यांसोबत तिने साखरपुड्याची घोषणा केली. स्मृती मंधाना हिने आपल्या साखरपुड्याची गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली त्यावेळी तिच्यासोबत जेमिमा रॉड्रिग्ज, श्रेयंका पाटील, राधा यादव आणि अरुंधती रेड्डी या चौघीही उपस्थित होत्या. 'लगे रहो मुन्ना भाई' या चित्रपटातील 'समझो हो ही गया' गाण्यासह एक उत्तम कोरिओग्राफ केलेले रील स्मृती आणि मित्रमंडळींनी शेअर केले आणि व्हिडीओच्या शेवटी साखरपुड्याची अंगठी कॅमेऱ्यासमोर धरली. लवकरच त्यांचे लग्न होणार आहे. याचदरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छाल यांच्या कुटुंबाला एक पत्र पाठवून शुभेच्छा संदेश दिला. त्यात येत्या रविवारी लग्न होणार असल्याचेही स्पष्ट झाले.
पंतप्रधान मोदी यांच्या पत्रात काय?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौ. स्मृती आणि चि. पलाश यांच्या २३ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या लग्नानिमित्त मंधाना आणि मुच्छाल कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी नवदाम्पत्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एकमेकांसोबत राहताना बळ मिळो, त्यांची स्वप्ने एकत्र गुंफली जावीत आणि त्यांचे जीवन आनंदी व समजूतदारपणाने भरलेले असावे, असे आशीर्वाद दिले. स्मृती आणि पलाश यांचा संसार विश्वास, प्रेम, जबाबदारी आणि एकमेकांवरील प्रेमाने भरलेला असावा. तसेच त्यांनी एकमेकांच्यात असलेल्या उणीवा स्वीकारून आपल्या वैवाहिक जीवनाची वाटचाल करावी, अशी सदिच्छा मोदी यांनी व्यक्त केली.
![]()
"तुम्हा दोघांची पार्टनरशी..."
पुढे त्यांनी लिहिले की, स्मृतीच्या 'कव्हर ड्राईव्ह'ची नजाकत आणि पलाशच्या मधुर संगीताचा मिलाफ एक अद्भुत भागीदारी बनेल. या शुभप्रसंगी 'टीम नवरदेव' आणि 'टीम वधू' यांच्यात क्रिकेट सामना आयोजित करण्यात आल्याबद्दल आनंद झाला. दोन्ही संघ आयुष्याच्या खेळात यशस्वी व्हावेत अशी मी इच्छा व्यक्त करतो. त्याचसोबत त्यांनी वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले.