Smriti Mandhana Palash Muchhal Wedding: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे २३ नोव्हेंबरला लग्न होणार होते. पण अचानक लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले. स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना लग्नाच्या दिवशी अचानक आजारी पडले, ज्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यादरम्यान, सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या. काही चॅट्सदेखील व्हायरल झाले, ज्यात पलाश मुच्छलने स्मृती मानधनाची फसवणूक केल्याचा दावा करण्यात आला. या सर्व दाव्यांना कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. तशातच पलाशच्या आईने लग्नाबाबत मोठे विधान केले आहे.
वडिलांना डिस्चार्ज
स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने लग्न स्थगित झाले होते. काही दिवसांपूर्वी स्मृतीच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे मानधना कुटुंबासाठी ही दिलासादायक बाब आहे. पण या साऱ्या गोंधळात पलाश मुच्छलची आई अमिता मुच्छल यांचे विधान आता समोर आले आहे. अमिता म्हणाल्या की सर्व काही नियोजित कार्यक्रमाप्रमाणे होईल. त्यांनी असेही स्पष्ट केले की पलाशचे स्मृतीच्या वडिलांशी खूप जवळचे नाते आहे आणि त्यांची प्रकृती लक्षात घेता, लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण लवकरच विवाहसोहळा पार पडेल.
लग्न लवकरच होईल!
अमिता मुच्छल यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले, "हळदी समारंभापासून आम्ही पलाशला बाहेर जाऊ दिले नव्हते. तो खूप तणावात आहे. त्याला चार तास रुग्णालयात ठेवावे लागले. आयव्ही ड्रिप, ईसीजी करण्यात आला. हळूहळू सर्व काही सामान्य झाले आहे, पण खूप ताण आहे. स्मृती आणि पलाश दोघेही परिस्थितीबद्दल चिंतेत आहेत आणि कुटुंब लग्नासाठी पूर्णपणे तयार आहेत. आमचा मुलगा लवकरच वधूला घरी आणेल. नियोजनाप्रमाणे सर्वकाही होईल आणि लग्न लवकरच होईल."
दरम्यान, स्मृती मानधना किंवा तिच्या कुटुंबीयांकडून यावर कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे.