Shreyas Iyer Injury Recovery Update: भारतीय वनडे क्रिकेट संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर सध्या सिडनीच्या रुग्णालयात उपचार घेत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात झेल घेताना त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला प्लीहा दुखापत झाली होती आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. आता त्याच्या जीवाचा धोका टळला असून, तो हळूहळू तंदुरूस्त होत आहे. त्याने स्वत:देखील आपल्या इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून आपण ठिक असल्याचे सांगितले आहे. पण या दुखापतीतून सावरताना, त्याला काही काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावे लागणार आहे. तो नेमका किती महिने क्रिकेट खेळू शकणार नाही, जाणून घेऊया.
अय्यरची दुखापत, टीम इंडियासाठी धक्का
मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयसच्या प्लीहाच्या दुखापतीनंतर अंतर्गत रक्तस्त्राव थांबवण्यासाठी त्याने इंटरव्हेंशनल ट्रान्स-कॅथेटर एम्बोलायझेशन केले. शरीरातील कोणत्याही भागात अंतर्गत रक्तस्त्राव थांबवण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. या अंतर्गत दुखापतीमुळे अय्यर दोन महिन्यांपर्यंत क्रिकेटपासून दूर राहू शकतो. हा टीम इंडियासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. या काळात भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत अय्यरची अनुपस्थिती नक्कीच जाणवेल. पुढे ११ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका आहे. तोवरही अय्यर तंदुरूस्त होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. परिणामी, टीम इंडियाला एकदिवसीय सामन्यांसाठी तात्पुरता नंबर ४चा नवा फलंदाज शोधावा लागणार आहे.
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरची पहिला सोशल मीडिया पोस्ट
श्रेयस अय्यरने दुखापतीनंतर पहिल्यांदाच स्वत: अपडेट दिली. "माझी प्रकृती आता सुधारते आहे. दिवसेंदिवस मी अधिक तंदुरूस्त होत आहे. तुम्हा सर्वांनी मला दाखवलेला पाठिंबा आणि माझ्यासाठी केलेल्या प्रार्थना याने मी भारावून गेलो आहे. तुम्ही सर्वजण माझी इतकी काळजी करता हे पाहून मला खूप समाधान वाटलं. माझे फॅन्सचे प्रेम हे माझ्यासाठी सर्वस्व आहे. तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केलेल्या सदिच्छांसाठी मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद!" अशा शब्दांत श्रेयस अय्यरने सोशल मीडियावरून आपल्या प्रकृतीची अपडेट दिली.
श्रेयसवर कुठलीही शस्त्रक्रिया झाली नाही...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले, "श्रेयसची प्रकृती झटपट सुधारतेय. जीवाचा धोका टळला आहे. श्रेयसवर शस्त्रक्रिया झालीच नाही. ती वेगळी प्रक्रिया होती. श्रेयस अय्यरसंदर्भात एक प्रक्रिया करण्यात आली जी अंतर्गत रक्तस्त्राव थांबवण्यासाठी करण्यात आली होती. म्हणूनच तो इतक्या लवकर बरा झाला. त्याची प्रकृती डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षा वेगाने सुधारत आहे. सामान्यपणे अशा प्रकारची दुखापत झालेल्या व्यक्तीला पूर्णपणे बरे होण्यासाठी सहा ते आठ आठवडे लागतात."