ॉसय्यद मुश्ताक अली चषक २०२४-२५ या देशांतर्गत टी-२० स्पर्धेत श्रेयस अय्यरमुंबई संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) या स्पर्धेसाठी १७ सदस्यीय संघाची नुकतीच घोषणा केली. रणजी करंडक स्पर्धेत मुंबई संघाची धूरा सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेचाही या संघात समावेश आहे. पण तो अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल. छोट्या फॉर्मेटमध्ये मुंबई संघात श्रेयसच प्रमोशन अन् अजिंक्य रहाणेच डिमोशन असा काहीसा सीन पाहायला मिळतो. सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धा २३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ अर्जुन तेंडुलकर ज्या संघाचा भाग आहे त्या गोवा संघाविरुद्ध सलामीचा सामना खेळताना दिसेल.
पृथ्वी शॉचं कमबॅक
टीम इंडियातून गायब झालेल्या २५ वर्षीय युवा सलामीवीर पृथ्वी शॉचीही मुंबईच्या संघात एन्ट्री झाली आहे. रणजी करंडक स्पर्धेत त्याला संघात स्थान मिळवण्यात अपयश आले होते. मेगा लिलावाच्या दिवशीच या स्पर्धेतील पहिली लढत होणार असल्यामुळे पृथ्वीसह अन्य खेळाडूंसाठी हा सामना आणखी खास ठरेल. मुंबईच्या संघात अनुभवी अजिंक्य रहाणेसह शार्दुल ठाकूर आणि सिद्धेश लाड हे खेळाडू देखील आहेत. भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव अखेरच्या टप्प्यात या स्पर्धेत मुंबईकडून एन्ट्री करू शकतो, अशी चर्चाहगी रंगताना दिसत आहे.
अय्यरची ढासू कामगिरी; त्यामुळेच IPL मेगा लिलावाआधी लागली लॉटरी
श्रेयस अय्यर हा भारतीय संघात पुन्हा कमबॅक करण्यासाठी धडपडताना दिसतोय. यंदाच्या देशांतर्गत क्रिकेटच्या काही स्पर्धेतील अपयशानंतर रणजी हंगामाची सुरुवात त्याने एकदम ढासू अंदाजात केलीये. एका द्विशतकासह शतकी खेळीनं त्याने रणजी स्पर्धेत ९०.४० च्या सरासरीनं ४५२ धावा कुटल्या आहेत. IPL मेगा लिलावाआधी कोलकाता नाईट रायडर्स संघानं त्याला रिटेन करण्याऐवजी रिलीज केलं होते. लिलावात अनेक फ्रँचायझी त्याच्या मागे धावू शकतात. एवढेच नाही तर तो अन्य फ्रँचायझी संघाकडून IPL मध्ये पुन्हा एकदा कॅप्टन्सी करताना दिसू शकतो. त्याआधी मुंबई संघाची कॅप्टन्सी मिळाल्यामुळे मेगा लिलावात त्याचा भाव आणखी वाढेल.
सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेसाठी मुंबईचा संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, अंगक्रिश रघुवंशी, जय बिस्ता, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, साईराज पाटील, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), आकाश आनंद (यष्टिरक्षक), शम्स मुलानी, तनुष सिंग, हिमांश. कोटियन, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, रॉयस्टन डायस आणि जुनैद खान.