भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात संजू सॅमसनची बॅट पुन्हा एकदा तळपली. सलग दोन बदकानंतर त्याने एखादं पदक द्यावं अशी कामगिरी करुन दाखवलीये. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जोहान्सबर्गच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात संजूनं अवघ्या ५१ चेंडूत शतक झळकावले. या शतकासह एका कॅलेंडर ईयरमध्ये आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ३ शतके ठोकणारा तो पहिला क्रिकेटर ठरला आहे.
KL राहुलचा विक्रम मोडला!
दी वाँडरर्स स्टेडियमवर वंडरफुल खेळी करताना संजू सॅमसन याने ५६ चेंडूत ६ चौकार आणि ९ षटकाराच्या मदतीनं नाबाद १०९ धावांची खेळी केली. १९४.६४ च्या स्ट्राइक रेटनं धावा करत त्याने लोकेश राहुलचा विक्रम मोडित काढला. या स्फोटक कामगिरीच्या जोरावर संजू एका कॅलेंडर ईयरमध्ये (२०२४) तीन टी-20 आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. एवढेच नाही तर भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० शतके झळकवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने लोकेश राहुलला मागे टाकले. लोकेश राहुलच्या खात्यात २ शतकांची नोंद आहे.
भारताकडून सर्वाधिक टी-२० शतके झळकावणारे फलंदाज
भारताकडून सर्वाधिक टी-२० शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा ५ शतकासह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या पाठोपाठ या यादीत सूर्यकुमार यादवचा नंबर लागतो. त्याच्या खात्यात ४ टी २० शतकांची नोंद आहे. संजू या यादीत आता तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या भात्यातून ५ डावात ३ शतके आली आहेत. तिलक वर्मा २ तर लोकेश राहुल २ शतकासह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.