युएईच्या मैदानात खेळवण्यात येणाऱ्या आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा झाली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघात स्थान मिळूनही एका खेळाडूच्या करिअर धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे संजू सॅमसन. आता तुम्ही म्हणाल संघात स्थान मिळाल्यावर कुठला आलाय धोका? तेच आपण सविस्तरपणे या लेखात जाणून घेणार आहोत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१० वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत फक्त ५८ सामने खेळण्याती संधी
संजू सॅमसन हा काही काल परवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आलेला चेहरा नाही. जुलै २०१५ मध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या टी-२० सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर ६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर २०२१ मध्ये त्याला वनडेत पदार्पणाची संधी मिळाली. आतापर्यंतच्या १० वर्षांच्या करिअरमध्ये त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ४२ आणि वनडेत फक्त १६ सामने खेळले आहेत.
Asia Cup 2025 : दुबईचं तिकीट मिळालं; पण या स्टार खेळाडूवर तिथं जाऊन बाकावर बसण्याचीच येणार वेळ!
सूर्याच्या नेतृत्वाखाली पदार्पणानंतर नवव्या वर्षी बॅक टू बॅक सेंच्युरीसह करिअरला मिळाली गती
पदार्पणानंतर कोणत्याही कर्णधाराने किंवा टीम मॅनेजमेंटनं त्याच्यावर फारसा विश्वास दाखवला नाही. पण सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टी-२० मधील त्याची कामगिरी कमालीची उंचावलीये. गतवर्षीच त्याने बॅक टू बॅक सेंच्युरीसह आपल्या टी-२० कारकिर्दीत ३ शतके झळकावली आहेत. एका वर्षातील दोन मालिकेत घडलंय. सूर्याच्या नेतृत्वाखाली डावाची सुरुवात करताना विकेट किपर बॅटरनं आपली खास छाप सोडली. पण आता हे सगळं बिघडण्याची परिस्थिती निर्माण झालीये. कारण आशिया कप स्पर्धेत तो तीन सलामीवीरांपैकी एक आहे.
ओपनिंगची फाईट अन् वातावरण टाईट
आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात अभिषेक शर्मा, शुबमन गिल आणि संजू सॅमसन या तीन सलामीवीरांचा समावेश आहे. अभिषेक शर्मा हा आयसीसी क्रमवारीत अव्वलस्थानावर आहे. त्यामुळे तो डावाची सुरुवात करणार हे जवळपास पक्के आहे. शुबमन गिलकडे उपकर्णधारपद असल्यामुळे तो प्लेइंग इलेव्हनमध्ये असणार हे फिक्स होते. हीच गोष्ट संजू सॅमसनसाठी रिस्क निर्माण करते. कारण अभिषेकसोबत शुबमन गिल सलामीला खेळताना दिसला तर प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळूनही संजूसाठी ते धोक्याचं ठरेल. कारण सलामीवीराच्या रुपात तो अधिक यशस्वी ठरला.
आता सगळं सूर्यावर, असा निघू शकतो तोडगा
शुबमन गिलच्या अनुपस्थितीत अभिषेक शर्मासोबत संजू सॅमसन डावाची सुरुवात करताना पाहायला मिळाले आहे. गिलच्या कमबॅकनंतर हाच प्रयोग कायम ठेवत सूर्यकुमार यादवला संजूला पाठिंबा द्यावा लागेल. या परिस्थितीत शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर आणि सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर हा प्रयोग आजमवता येईल. बॅटिंग ऑर्डरचा क्रम ठरवण्यात कर्णधाराची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे संजूवरील धोका टाळण्यात बऱ्यापैकी सूर्यकुमार यादवच्या भूमिकेवर अवलंबून असेल. शुबमन गिल हा कसोटी संघाचा कर्णधार झाल्यामुळे त्याचं वजन वाढलंय. भविष्यात तो तिन्ही फॉर्मेटमध्ये संघाचे नेतृत्व करेल, अशीही चर्चा रंगतीये. त्यामुळे शुबमन गिलही या प्रयोगाला तयार असणं तेवढंच गरजेचे ठरेल.
गिलनं कसोटीत मोठेपणा दाखवलाय, आता टी-२० तो संजूवर मेहरबानी दाखवणार का?
शुबमन गिल हा कसोटीतही डावाची सुरुवात करायचा. पण इंग्लंड दौऱ्यावर कॅप्टन्सीसह त्याच्या बॅटिंग ऑर्डरमध्येही बदल झाला. यशस्वी जैस्वालसोबत लोकेश राहुलला जागा मोकळी करून देत तो चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसले. ज्याचा संघासह त्यालाही फायदा झाला. हाच मोठेपणा तो टी-२० मध्ये दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.