UP T20 League Rinku Singh Fifty : आशिया कप स्पर्धेआधी भारतीय टी-२० संघातील फिनिशर रिंकू सिंह लोकल लीगमध्ये धमाकेदार खेळीचा नजराणा पेश करताना दिसत आहे. मेरठ मावेरिक्स (Meerut Mavericks) नेतृत्व करणाऱ्या रिंकूनं UP T20 League मध्ये आणखी एक दमदार अर्धशतक झळकावले आहे.
२११.११ च्या स्ट्राइक रेटसह झळकावली दमदार फिफ्टी
उत्तर प्रदेशमधील लोकल टी -२० लीगमध्ये खेळवण्यात आलेल्या २० व्या सामन्यात रिंकू सिंहनं २७ चेंडूत ५७ धावा कुटल्या. त्याची ही खेळी ३ चौकार आणि ४ षटकारांसह बहरलेली होती. १८ व्या षटकात आपली विकेट गमावण्याआधी त्याने २११.११ च्या स्ट्राइक रेटसह संघासाठी उपयुक्त खेळी साकरली.
रिंकू शिवाय या दोघांची अर्धशतके
UP T20 League मधील सामन्यात मेरठ मावेरिक्स (Meerut Mavericks) च्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी केली. सलामीवीर स्वस्तिक चिकार याने ५५ धावांची खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना रिंकू सिहनं झळकावलेल्या अर्धशतकाशिवाय ऋतुराज शर्मानं ३७ चेंडूत ७४ धावांची नाबाद खेळी केली. या जोरावर रिंकूच्या संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २३३ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना लखनौ फाल्कन्सचा संघ १८.२ षटकात १४० धावांवर आटोपला. रिंकूच्या संघाने ९३ धावांनी हा सामना अगदी एकतर्फी जिंकला.
आशिया कप स्पर्धेआधी रिंकूचा धमाक्यावर धमाका
रिंकू सिंह हा आशिया कप स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाचा भाग आहे. गेल्या काही दिवसांत फारशी चांगली कामगिरी केली नसताना टीम व्यवस्थापनाने त्याच्यावर भरवसा दाखवला आहे. आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड होताच रिंकू सिंह कमालीच्या फॉर्ममध्ये परतलाय. याआधीच्या सामन्यात त्याने गोरखपूर लायन्स विरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली होती.